फ्रान्समध्ये सध्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सव सुरू आहे. जगभरातील सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी या कान्स महोत्सवात हजेरी लावली आहे. भारताने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट'चित्रपटाला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॉर्ड (ग्रांप्री) मिळाला आहे. चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील खास शब्दात पायल कपाडिया यांचं कौतुक केलं आहे.
पायल यांचं अभिनंदन करत पीएम मोदींनी चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स जिंकण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खास पोस्ट केली आहे. पीएम मोदींनी पोस्टमध्ये लिहिले - ' 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट'साठी कान्समध्ये ग्रँड प्रिक्स जिंकण्याच्या पायल कपाडिया यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा भारताला अभिमान आहे. FTII ची माजी विद्यार्थिनी असलेल्या पायल यांची उल्लेखनीय प्रतिभा जागतिक स्तरावर चमकली. शिवाय यातून जगाला भारतातील समृद्ध सर्जनशीलतेची झलक दिसली. हा प्रतिष्ठित पुरस्कार केवळ त्यांच्या कौशल्यांचा गौरव करत नाही तर भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देतो'.
'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'चा प्रीमियर 23 मे 2024 रोजी कान्स येथे झाला, ज्यामध्ये या चित्रपटाला 8 मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. ‘इन ऑल वी नो अॅज लाइट’ चित्रपटात कपाडिया यांनी केरळमधून येऊन मुंबई शहराच्या रुग्णालयात काम करणाऱ्या आणि याकाणी एका लहान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दोन नर्सचं जीवन दाखवलं आहे. कपाडिया यांची ही पहिली नरेटिव्ह फिचर फिल्म आहे. पायल कपाडिया या ग्रँड प्रिक्स अवॉर्ड जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय फिल्ममेकर आहे. पुरस्कार स्वीकारताना पायलसोबत 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाची स्टारकास्टही उपस्थित होती.