मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातील उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याबाबत दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही रात्री अकराच्या सुमारास सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाचे अनेक प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. मध्यरात्री ३.३० वाजती ही बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदी निवासस्थानी गेले. त्यावरुन, आता मोदींच्या कार्यक्षमतेचं कौतुक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८-अठरा तास काम करतात, कमी झोप आणि अधिक काम ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे, अनेकदा त्यांना यासंदर्भाने प्रश्नही विचारण्यात आला होता. न थकता, न रुकता मोदी कामात आणि नियोजित दौऱ्यात कार्यमग्न असतात. विशेष म्हणजे मोदींनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या अंत्यसंस्कारानंतरही तातडीने दिल्लीला रवाना होत आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यामुळेच, भाजपा समर्थकांकडून मोदींचं नेहमीच कौतुक होत असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदींचं कौतुक करताना, मोदींनी १० वर्षात एकही सुट्टी घेतली नाही, असे म्हटले. तर, दुसरीकडे आता कंगनौ रणौतनेही मोदींचा व्हिडिओ शेअर करत, त्यांच्या क्रियाशीलतेचं कौतुक केलं आहे.
पंतप्रधान जर कुठल्या ऐहिक दैवी शक्तीने चालत नसतील, तर या अतिमानवी हेतू, इच्छाशक्ती आणि चिकाटीचे कारण काय असू शकते?, असा सवाल कंगनाने विचारला आहे. कंगनाने तिच्या प्रश्नार्थक वाक्यातून मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे. कार, या व्हिडिओत मध्यरात्री ३.३० वाजता भाजपा पक्षाची बैठक संपल्यानंतर नरेंद्र मोदी आपल्या पीएमओ निवासस्थानाकडे निघाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे रात्री ३.३० वाजता घरी पोहोचूनही ते सकाळी नियोजित पश्चिम बंगाल दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळेच, कंगनाने हा व्हिडिओ शेअर करत मोदींच्या कार्याचं कौतुक करणारं ट्विट केलं आहे.
१०० उमेदवारांची लवकरच घोषणा
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत वेगवेगळ्या राज्यांसाठी स्वतंत्र बैठका सुरू आहेत. या बैठकीनंतरच यादी जाहीर करण्याचे काम सुरू होईल. पुढील दोन दिवसांत १०० ते १५० उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राजकीय जाणकारांच्या मते, वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जवळपास निश्चित आहे. ते तिसऱ्यांदा भाजपच्या चिन्हावर वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. यासोबत गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील गांधी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातून भाजपचे उमेदवार असू शकतात.