बॉलीवुडमध्ये 'दबंग' खान अशी ओळख असलेल्या सलमान खानला गँगस्टर गोल्डी बराडकडून धमकी मिळाली आली आहे. यानंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबईपोलिसातील जवान रात्रभर सलमानच्या बांद्रा येथील 'गॅलेक्सी' घराबाहेर गस्त घालतानाही दिसून आले. सलमानला मिळालेल्या धमकीनंतर पोलीस फुलऑन अॅक्शन मोडवर आहे.
सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर पोलीसही अॅक्शन मोडवर -सलमान खानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकर यांना 18 मार्चला एक धमकीचा ई-मेल आला. यात सलमान खान सोबत बोलण्याची मागणी करण्यात आली होती. हा मेल रोहित गर्ग नावाने आला आहे. यात 'गोल्डी बराड'ला तुझ्या बॉससोबत सलमान खानसोबत बोलायचे आहे. त्याने कदाचित मुलाखत बघितली असेल. नसेल बघितली, तर बघायला सांग. मॅटर क्लोज करायचे असेल तर बोलायला सांग. फेस टू फेस करायचे असेल तर तसेही सांग. आता वेळ आहे म्हणून इन्फॉर्म केले. पुढच्या वेळी झटकाच बघायला मिळेल,' असे या ई-मेलमध्ये म्हणण्यात आले आहे.
यानंतर, सलमान खानच्या मॅनेजरने मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि सलमान खानची सुरक्षितता लक्षात घेत, बांद्रा पोलिसांनी IPC चे कलम 506(2), 120 (B) आणि 34 अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड आणि रोहित बराड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. याच बरोबर, सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षाही वाढविली आहे.
लॉरेन्सला हवी आहे सलमान खानची माफी -तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. काळवीट प्रकरणाबाबत लॉरेन्सने सांगितले होते की, त्यांच्या परिसरात कोणत्याही प्राण्यांची हत्या होत नाही, तेथे झाडे तोडली जात नाहीत आणि बिश्नोई लोकांची संख्या जिथे होती तिथे सलमानने शिकार केली. लॉरेन्सने सलमानला येऊन माफी मागायला सांगितली आहे. सलमानने हे केले नाही तर त्याचा अहंकार कसा संपवायचा ते पाहिले जाईल, असेही लॉरेन्सच्या वतीने सांगण्यात आले. यातच, अभिनेता सलमानला खानला धमकीचा मेल आल्याची बातमी आल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे.