Ponniyin Selvan: मणिरत्नमचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन-1' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून ट्रेलरपर्यंत सर्वच गोष्टींचे सिने चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. 'पोनियिन सेल्वन'ची टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात अभिनेता चियान विक्रम याने एका प्रश्नाच्या उत्तरात चोल साम्राज्य आणि भारताच्या गौरवशाली इतिहासावर जोरदार भाषण केले.
व्हिडिओ व्हायरलविक्रमच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओसह #PonniyinSelvan1 ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. या भाषणात विक्रम चोल साम्राज्य आणि आपल्या इतिहासाबद्दल बोलत आहे. तसेच, यात तो पाश्चात संस्कृती आणि भारतीय संस्कृतीवरही भाष्य करतो.
विक्रम म्हणतो, 'आपण सगळे पिरॅमिड बघायला जातो, पिसाचा झुकलेला बुरुज बघायला जातो. तुम्ही अशा इमारतींचे कौतुक करत आहात जी उभीही नाही. आपण तिथे जाऊन फोटो आणि सेल्फी घेतो, पण आजही भारतात अशी मंदिरे आहेत, जी शेकडो वर्षांपासून जशीच्या तशी उभी आहेत. अनेक भूकंप येऊन गेले, पण या मंदिराला काही झाले नाही.' विक्रम ज्या मंदिराबद्दल बोलत आहे, ते तंजावरमधील बृहदीश्वर मंदिर आहे. या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. ग्रॅनाइटपासून बनवलेले हे मंदिर जगातील अशा प्रकारचे एकमेव मंदिर आहे. तमिळ वास्तुकलेच्या सर्वात भव्य उदाहरणांमध्ये त्याची गणना केली जाते.
पहा व्हिडिओ...
त्याबद्दल बोलताना विक्रम म्हणो, 'या मंदिरासाठी चोल राजाने एक 6 किलोमीटर लांब उतार बांधला होता. त्यावरुन बैल-हत्ती आणि मानवांच्या मदतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले. कोणत्याही यंत्राशिवाय, कोणत्याही क्रेनशिवाय आणि प्लास्टरविना हे मंदिर बांधले गेले आहे. अनेक भूकंपाचे धक्के या मंदिराने सहन केले . या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत.'
अमेरिकेचा शोधही लागला नव्हताविक्रम पुढे म्हणतो की, 'या सर्व गोष्टी 9व्या शतकात तयार झाल्या आहेत. आज तुम्ही महासत्तांबद्दल बोलता, त्या काळात आपल्याकडे जगातील सर्वात मोठे नौदल होते. बाली, मलेशिया आणि चीनशी आपला सागरी मार्गाने व्यापार व्हायचा. या घटनेच्या 500 वर्षांनंतरही अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला नव्हता. आपला ऐतिहासीक वारसा आपणच जपला पाहिजे. उत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत, पूर्व भारत, असे काही नाही. आपण सर्व भारतीय आहोत.
30 सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शितमणिरत्नम यांचे दिग्दर्शन असलेला आणि एआर रहेमान यांनी संगीतबद्ध केलेला 'पोन्नियिन सेल्वन-1' 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट महान अशा चोल साम्राज्यावर आधारित आहे. यात विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी, त्रिशा आणि प्रकाश राज अशी तगडी स्टारकास्ट आहे. तमिळमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होत आहे.