सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. पण काही लोकांना ही गोष्ट अतिशय साधी वाटत असून या व्हायरमुळे देशात किती भयानक परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना देखील नाहीये.
लॉकडाऊन घोषित झाला असला तरी अनेकजण काहीही काम नसताना देखील रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. काही जण तर सुट्टी मिळाल्याच्या आनंदात कुटुंबासोबत बाहेर वेळ घालवत आहेत. ही अवस्था अतिशय भीषण असून याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील असे म्हणत सरकारी व्यवस्थेवर एका अभिनेत्रीने बोट ठेवले आहे.
अभिनेत्री पूजा बेदीने नुकताच समुद्र किनाऱ्यावरचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत कॅप्शनद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने लिहिले आहे की, खरंच हा लॉकडाऊन आहे का? की लोक समुद्र किनाऱ्यावर सुट्ट्या असल्याने फिरायला आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आपण कशाप्रकारे थांबवणार आहोत? पूजाने या ट्वीटमध्ये महाराष्ट्र पोलिस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.
पूजा बेदीचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून या ट्वीटला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पूजाने मांडलेला मुद्दा हा बरोबर असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे तर पोलिसांचे आणि सरकारचे लोक ऐकतच नाहीयेत त्यात पोलिस आणि सरकार काय करणार असा प्रश्न देखील काहींनी उपस्थित केला आहे.