Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर १६ जानेवारीला एका बांगलादेशी घुसखोराने घरात घुसून चाकूने हल्ला केला होता. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्जरी नंतर सैफला मंगळवारी(२१ जानेवारी) घरी सोडण्यात आलं. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर सैफचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये हॉस्पिटलमधून घरी येताना सैफ अगदी फिट दिसत होता. याशिवाय तो चालत घरी आला. यावरुन त्याला ट्रोल केलं गेलं होतं. सैफ इतका फिट कसा? असा प्रश्नही उपस्थित केला गेला होता. त्यावरुन आता बॉलिवूड अभिनेत्री पूजा भटने प्रतिक्रिया दिली आहे.
सैफच्या फिटनेसवरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. पूजाने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. ती म्हणाली, "सैफवर चाकू हल्ला झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या मनात त्याच्याबद्दल एक इमेज तयार केली. कदाचित सैफ हॉस्पिटलमधून स्वत:च्या पायावर चालत बाहेर आला या गोष्टीला ती इमेज मॅच झाली नसावी. पण, सैफ स्वत: चालून हॉस्पिटलला गेला याबाबत लोकांनीच त्याचं कौतुक केलं होतं. ही गोष्ट लोक विसरून गेले का?"
"जी व्यक्ती जखमी अवस्थेत स्वत: हॉस्पिटलमध्ये जाते. त्या व्यक्तीकडे हॉस्पिटलमधून स्वत:च्या पायावर चालत बाहेर येण्याची शक्ती असते. आपल्याला या लोकांना सपोर्ट करण्याऐवजी सैफचं कौतुक केलं पाहिजे", असं तिने म्हटलं आहे.