Join us

​पूजा भट्टने ‘यामुळे’ कायमची सोडली दारू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2017 6:47 AM

अभिनेत्री पूजा भट्ट ही मद्याच्या आहारी गेली होती. पण गत ६९दिवसांपासून पूजाने मद्याला स्पर्श देखील केला नाही. गत २४ ...

अभिनेत्री पूजा भट्ट ही मद्याच्या आहारी गेली होती. पण गत ६९दिवसांपासून पूजाने मद्याला स्पर्श देखील केला नाही. गत २४ डिसेंबरला पूजाने मद्य सोडण्याचा निर्धार केला होता. यानंतर ख्रिसमस, न्यू इयर अशा कुठल्याही पार्टीत पूजाने मद्याचा एक थेंब देखील घेतला नाही. इतकेच नाही तर गत २४ फेबु्रवारीला पूजाचा ४५ वा वाढदिवस झाला. त्याची पार्टी देखील मद्याविना रंगली. मद्यपान सोडण्याचा निर्णय पूजाने कसा घेतला आणि का घेतला, याविषयी अलीकडे ती मनमोकळेपणाने बोलली.२१ डिसेंबरला पापा महेश भट्ट यांचा पूजाला दिल्लीहून फोन आला. दोघांचेही बोलणे सुरु झाले. विषय होता, देशाची सद्यस्थिती, राजकारण, सत्तेसाठी सुुरू असलेली कटकारस्थाने. पूजा याबद्दल सांगते, आम्ही खूपवेळ बोललो. पापांनी फोन ठेवताना मला, ‘आय लव्ह यू बेटा’ म्हटले. मी सुद्धा ‘आय लव्ह यू पापा’ म्हणत जगात तुमच्यापेक्षा माझ्यासाठी काहीही मोठे नाही, असे यांना म्हणाले. यावर पापा जे काही बोलले, ते ऐकून मी स्तब्ध झाले. तू माझ्यावर प्रेम करत असशील तर मग स्वत:वर प्रेम करायला शिक़ कारण मी तुझ्याच हृदयात राहतो, असे पापा मला बोलून गेले. त्यांच्या त्या वाक्याने मी खळबळून जागे झाले.त्याक्षणी मी पापांना वचन दिले. हे वचन होते, मी सर्वोत्तम बनून दाखवणार. फोन ठेवल्यानंतर मी बराच विचार केला. कुणासोबत बाहेर जाणे आणि एक बॉटल व्हिस्की पोटात रिचवणे म्हणजे स्वत:वर प्रेम करणे आहे? असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. मला उत्तर मिळाले, ‘नाही’. त्याक्षणाला मी मद्यपान सोडण्याचा निर्णय घेतला. ख्रिसमसला मी फोन बंद करून पावणे बाराला बेडवर गेले. रात्री बाराच्या ठोक्याला चर्चची घंटी वाजली. ती ऐकून मला कधी नव्हे इतके फ्रेश वाटले. यानंतर मी खूप देशांत फिरले. पण मद्यापासून दूर राहिले. बर्थ डे पार्टीत एक छोटासा ड्रिंक घेऊन घेऊ, असे मला वाटले. पण मी क्षणभर थांबले. मला खरच याची गरज आहे? असे स्वत:लाच विचारले. उत्तर ‘नाही’असेच आले. आलियाला फिल्मफेअर मिळाला. पण त्याचा आनंदही मी ड्रिंक न घेता साजरा केला. मी २३ वर्षांची असताना पहिली सिगारेट ओढली होती. १६ वर्षांपासून ड्रिंक करायला लागले होते. अँग्लो इंडियन कुटुंब असल्याने जेवणाच्या टेबलावर मद्य आमच्यासाठी कॉमन गोष्ट होती. पण आज कळले, मी अल्कोहोलपासून स्वत:ला रोखू शकत नसेल तर माझा स्वत:ला कंट्रोल नाही. पण आता मी कंट्रोल करायला शिकलेय. अल्कोहोल आयुष्यातून गेल्यापासून मला कामासाठी अनेक तास मिळू लागले आहेत.