आपल्या सौंदयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री पूनम ढिल्लोन (Poonam Dhillon) हिचा आज वाढदिवस आहे. पूनमचा जन्म 18 एप्रिल 1962 रोजी कानपूरमध्ये जन्मलेल्या पूनमने 1977 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आणि अचानक प्रसिद्धी झोतात आली. पुढे एका मॅगझिनमध्ये पूनमचे छायाचित्र बघून दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांनी तिला ‘त्रिशुल’ची ऑफर दिली. आधी पूनमने ही ऑफर नाकारली. पण नंतर या चित्रपटाला होकार कळवला. ‘त्रिशुल’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि यानंतर पूनमने कधीच मागे वळून पाहिले नाही. (Poonam Dhillon Birthday Special)
अन् शशी कपूर यांनी पूनमला सर्वांसमोर थप्पड लगावली...
पहिल्याच सिनेमात पूनमला संजीव कुमार, शशी कपूर (Shashi Kapoor) व अमिताभ बच्चन यांच्यासारख्या बड्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. याच सिनेमाच्या एका सीनमध्ये शशी कपूर यांना पूनमला थप्पड मारायची होती. अॅक्शन हा शब्द ऐकल्यानंतर पूनमला न सांगताच शशी यांनी तिला जोरात कानशिलात लगावली होती. सांगून थप्पड मारली असती तर कदाचित हा सीन कृत्रिम वाटला असता. सीन अधिकाधिक रिअल वाटावा, म्हणून शशी कपूर यांनी हे केले होते. अर्थात नंतर मात्र त्यांनी सर्वकाही सांगत पूनमची माफीही मागितली होती.
रोज एक गुलाबाचे फुल1988 साली पूनमने निर्माते अशोक ठाकरियासोबत लग्न केले. पूनमला पाहताच क्षणी अशोक तिच्या प्रेमात पडले होते. अगदी वेडेपीसे झाले होते. पूनमचा होकार मिळेपर्यंत दररोज ते तिला एक गुलाबाचे फूल पाठवत होते. अशोक यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पूनमने सिनेमात काम करणे कमी केले. पूनम-अशोक यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झालीत. पण दुर्दैवाने त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. 1997 मध्ये अशोक आणि पूनम यांचा घटस्फोट झाला.