पद्मिनी कोल्हापूरे... हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. 'प्रेम रोग', 'आहिस्ता आहिस्ता', 'वो सात दिन', 'विधाता' अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे (Padmini Kolhapure ) यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे 80च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती.
पद्मिनी यांनी वयाच्या 21 व्या वर्षी घरातून पळून जाऊन लग्न केले होते. या लग्नासाठी पद्मिनीच्या कुटुंबाचा विरोध होता. दोघे वेगळे धर्माचे होते म्हणून पद्मिनी आणि प्रदीप शर्मा यांचे नाते कुटुंबाला मान्य नव्हते. पद्मिनी आणि प्रदीप शर्मा यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये. दोघांची भेट 'ऐसा प्यार कहा' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तिथूनच या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. या चित्रपटाचे निर्माता प्रदीप शर्मा होते.
पद्मिनी आणि पुनम ढिल्लन दोघींनी नुकतीच ‘सा रे ग म प 2021' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघेही जुन्या आठवणीत रमताना दिसल्या.पद्मिनीने आपल्या कुटुंबियांच्या मर्जीविरुध्द कसे लग्न केले आणि तेव्हा तिला आपण आपले दागिने देऊन कशी मदत केली, याचा किस्साही पुनम यांनी सांगितला.पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या की ,“पूनम ही नेहमीच मला काही ना काही देत आली आहे आणि आमची मैत्री कायम राहण्यात तिचा वाटा मोठा आहे. माझ्या लग्नाला माझ्या आई-वडिलांचा विरोध होता, तेव्हा पूनमनेच मला खूप मदत केली होती.”
पूनम धिल्लन म्हणाली, “ पद्मिनीने लग्नात जे दागिने घातले होते, ते मीच तिला दिले होते. आम्ही सर्व तेव्हा इतके लहान होतो आणि पद्मिनी लग्नात कोणते कपडे घालणार,तेही आम्हाला माहित नव्हतं. त्यामुळे आम्ही तिच्यासाठी नवे कपडे घेतले. आम्ही दोघींनी अनेक उतार-चढाव एकत्र अनुभवले आहेत, अनेक सुखं आणि दु:खं एकत्र भोगली आहेत. माझ्या मते कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं, ते परमेश्वर ठरवतो, पण एक नातं निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असतं आणि ते नातं म्हणजे मैत्रीचं. मी आमच्या मैत्रीखातर काहीही करण्यास तयार आहे.”