२१ मे, १९९९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट सूर्यवंशम आजही अनेक लोक वारंवार पाहताना दिसतात. आजही हा चित्रपट छोट्या पडद्यावर पहायला मिळतो. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री सौंदर्याने काम केले होते. तसा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र या चित्रपटातून सौंदर्या लोकप्रिय ठरली होती. सौंदर्याचा जन्म १८ जुलै, १९७२ साली झाला होता. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत बरेच सिनेमात झळकली आहे.
सूर्यवंशम सौंंदर्याचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. १९९२ साली कन्नड चित्रपट गंधर्वमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते आणि १२ वर्षांच्या करिअरमध्ये तिने एकूण १४ सिनेमात काम केले होते. सौंदर्या व्यावसायिक आणि चित्रपट लेखक-निर्माता केएस सत्यनारायण यांची मुलगी होती. सौंदर्या एमबीबीएस करत होती तेव्हा तिच्या वडिलांच्या मित्रांनी तिला चित्रपटांची ऑफर दिली होती. त्यानंतर तिने शिक्षण सोडले आणि ती अभिनेत्री झाली.
सौंदर्याने हिंदी, तमीळ, तेलगू आणि अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. तिने जास्त तमीळ सिनेमात काम केले होते. २००३ साली तिने क्लासमेट आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर जीएस रघुसोबत लग्न केले होते. चित्रपटात लोकप्रियता मिळाल्यानंतर तिने राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि तिने भाजप पक्षात प्रवेश केला.
१७ एप्रिल, २००४ साली सौंदर्या भाजप पक्षाच्या एका उमेदवाराच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करीमनगरला जात होती. मात्र हेलिकॉप्टर १०० फूट उंचीवर गेल्यावर क्रॅश झाले होते. या अपघातात सौंदर्या, तिचा भाऊ आणि इतर दोन लोकांचा मृत्यू झाला होता. हा अपघात झाला तेव्हा सौंदर्या सात महिन्यांची गरोदर होती. सौंदर्याने फक्त वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. या घटनेला जवळपास १६ वर्षे उलटले आहेत आणि आजही चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर करून कायम आहे.