वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बाईक स्टंट करणा-यांचा ‘हिरो’ मानला जाणारा लोकप्रिय युट्युबर निजामुल खान याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेयसीच्या भावाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बाइकर्सची एक गँग रोज पहाटे स्टंट करण्यासाठी जमा होते. ही गँग युट्यूबर निजामुलची फॅन आहे. निजामुलचे व्हिडीओ पाहून ते रोज नवे स्टंट करतात. मात्र अनेकांचा हिरो असलेला हाच निजामुल हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबरला निजामुलने आपल्या मित्रांसोबत मिळून कमल शर्मा नामक व्यक्तिवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. कमल शर्मा हा निजामुलच्या प्रेयसीचा भाऊ होता. कमलचा बहिणीच्या व निजामुलच्या प्रेमाला विरोध होता. निजामुलने पोलिसांसमोर केलेल्या खुलाशानुसार, भावाच्या हत्येबद्दल कमलच्या बहीणीलाही माहिती होती.
काय आहे प्रकरणयुट्युबर निजामुल आणि कमल शर्माची बहिण एकमेकांच्या प्रेमात होते. 2017 पासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. यादरम्यान कमल शर्माला बहिणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळले. त्याने तिला निजामुलला भेटण्यास मनाई केली. तिचा मोबाईलही हिसकावून घेतला. शिवाय निजामुललाही बहिणीपासून दूर राहण्याचे बजावले. याच रागातून निजामुलने प्रेयसीचा भाऊ कमल शर्माच्या हत्येचा कट रचला.
28 ऑक्टोबरच्या रात्री 26 वर्षीय कमल शर्मा आपल्या कामावरून घरी परतत असताना मुख्य आरोप निजामुल व त्याच्या मित्रांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात कमल शर्माचा मृत्यू झाला. निजामुल व त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. कमलची हत्या करण्यासाठी निजामुलने पंडित नामक व्यक्तिकडून देशी कट्टा खरेदी केला होता, असेही पोलिस तपासातून पुढे आले आहे.