बॉलिवूड कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता मंगल ढिल्लो यांचं निधन झालं आहे. गेल्या कित्येक काळापासून ते कर्करोगासोबत झुंज देत होते. अखेर आज (११ जून) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत.
अभिनेता यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मंगल ढिल्लो (Mangal Dhillon) यांच्या निधनाची माहिती दिली. मंगल ढिल्लो यांना कर्करोग झाला होता आणि कित्येक वर्षांपासून ते या आजाराशी लढा देत होते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी एका महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात त्यांच्या कर्करोगावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे १८ जून रोजी त्यांचा वाढदिवस असतो. मात्र, त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगल ढिल्लो यांच्या पश्चात त्यांची पत्नी रितू ढिल्लो असून त्या मंगल यांना त्यांच्या प्रोडक्शनच्या कामात मदत करायच्या. तसंच त्या प्रोड्युसर आणि डायरेक्टरदेखील आहेत. एमडी अँड कंपनी हे त्यांचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. या प्रोडक्शनअंतर्गत ते पंजाबी सिनेमांची निर्मिती करतात.
दरम्यान, मंगल यांनी सिनेमांसह मालिकांमध्येही काम केलं आहे. मंगल यांनी रेखाची मुख्य भूमिका असलेल्या 'खून भरी मांग' या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारली होती. तसंच 'दयावान', 'जख्मी औरत', 'प्यार का देवता', 'विश्वात्मा' आणि 'दलाल' या सिनेमात काम केलं आहे. सोबतच ते 'बुनियाद', 'कथा सागर', 'जुनून', 'मुजरिम हाजिर', 'मौलाना आजाद', 'परमवीर चक्र', 'युग' , 'नूर जहां' या मालिकांमध्येही झळकले आहेत.