Join us  

'पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का?', वसई हत्या प्रकरणावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा संताप, Post व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:43 PM

प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे.

वसईमध्ये भरदिवसा रस्त्यात एका तरुणीची प्रियकराने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करत तिची हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून सर्व स्तरांतून या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.  या प्रकरणाने सध्या वातावरण फारच तापलेलं पाहायला मिळते. या घटनेवर आता  मराठी, हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे.

वसईतील हत्येप्रकरणी समीर विद्वांस यांनी एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.  त्यांनी लिहलं, 'वसईत एका मुलीचा तिच्या तथाकथित प्रियकराने दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष निर्घृण खून केला. हे असं वारंवार होत असतं. भयानक आहे हे. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का? मुर्दाड बघ्यांचं काय करायचं हे प्रश्न आहेतच'.

पुढे त्यांनी लिहलं, 'पण आता असं वाटत नाही का की शाळांमधून (मराठी, इंग्रजी, महानगरपालिका, खासगी किंवा इतर..) सर्व ठिकाणी मानसशास्त्र हा विषय असायला हवा? मानसोपचार तज्ज्ञ/समुपदेशक बोलावून लहानपणापासून गोष्टी शिकवायला हव्यात? पालकांचेही वेळोवेळी सेशन्स व्हायला हवेत? मला तरी असं वाटतं, की याचा गांभीर्याने विचार करायला हवा. प्रयत्न तरी नक्कीच व्हायला हवेत'. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

वसई हत्या घटनेबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोपी रोहित यादव (29) आणि आरती यादव (20) यांच्यात बिनसलं होतं. रोहितला संशय होता की आरतीचं इतर कोणत्यातरी मुलासोबत अफेर आहे. आरतीला मारण्याआधी त्याने वाट अडवली तेव्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर रोहितने हल्ला करत तिला संपवलं.  

टॅग्स :समीर विध्वंससेलिब्रिटीवसईवसई विरारमृत्यू