बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली. अश्लिल चित्रपटांची निर्मिती करून ते अॅपवर अपलोड करण्याचा (Pornographic Film Racket) आरोप त्याच्यावर आहे. याचवर्षी फेब्रुवारीत समोर आलेल्या या प्रकरणाचा सलग 6 महिने तपास केल्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. आता याप्रकरणी राजच्या वकीलांचे स्टेटमेंट समोर आले आहे.अॅपवर अपलोड करण्यात आलेला कंटेंट वल्गर होता. पण तो पॉर्न कॅटेगरीत येत नाही, असा युक्तिवाद राजचे वकील आबाद पोंडा यांनी केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,मंगळवारी राजच्या वकीलांनी कोर्टात आपली बाजू मांडली. कंटेंटला पोर्नोग्राफी म्हणणे योग्य नाही, असे वकीलांनी म्हटले. राज कुंद्रा आणि रायन थार्प पोर्नोग्राफी कंटेंट बनवत होते, असे काहीही रिमांडमध्ये दिसलेले नाही. कंटेंट वल्गर होता पण कायदेशीर भाषेत त्याला अश्लील म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद वकीलांनी केला. अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नसेल तरच अटक करण्यात यावी. पण या प्रकरणात अटकेनंतर त्यांची चौकशी केली गेली, असेही वकीलांनी म्हटले. राज कुंद्रा यांची अटक कायद्याला धरून नसल्याचा दावा त्यांनी केला.
राजवर झालेल्या कारवाईमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम 67 अ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लिल साहित्य पाठवण्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये हा कलम लावला जातो. प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवताना (संभोग करतानाचे) साहित्य असल्यास त्याला कायदेशीर भाषेमध्ये पॉर्न म्हणतात. इतर सर्व साहित्याला अश्लील (vulgar) म्हणता येईल, असा युक्तिवाद वकिलांनी केला.
सोमवारी रात्री मुंबई गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटक केली आहे. त्याच्यासोबतच त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थार्प याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज कुंद्रासोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील अडचणीत आली आहे. राजच्या कंपन्यांमध्ये किंवा त्याच्या पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा हात आहे किंवा नाही याची देखील सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे. मात्र अद्याप शिल्पा शेट्टीची चौकशीची गरज भासत नसून तिला समन्स बजावण्याची आवश्यता नसल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. तसेच या प्रकरणात अजून काही लोकांना अटक होईल अशी शक्यता देखील नसल्याचं त्यांनी पुढे सांगितले. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा दिला आहे.