Adipurush Release Date: साऊथ सुपरस्टार प्रभास ( Prabhas ), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon ) अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘आदिपुरूष’ (Adipurush) पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. ‘तान्हाजी’ फेम दिग्दर्शक ओम राऊत हा सिनेमा दिग्दर्शित करतोय म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण गेल्या महिन्यात नवरात्रीच्या मुहूर्ताला मेकर्सनी ‘आदिपुरूष’चा टीझर रिलीज केला आणि तो पाहून चाहत्यांची प्रचंड निराशा झाली. अगदी चाहत्यांची उत्सुकता निराशेत बदलली. टीझरला जबरदस्त ट्रोल केलं गेलं. सिनेमातील रावण आणि हनुमानाचा लुक लोकांना काही केल्या पचनी पडला नाही. यातील व्हिएफएक्स सीन्सचीही प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. सिनेमातील कलाकारांची निवडच चुकली म्हणत, लोकांनी या चित्रपटाच्या मेकर्सला नको ते ऐकवलं. रामायणावर आधारित या चित्रपटात तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याची चर्चा होती. ‘आदिपुरूष’ अशा नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. होय, चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे.
‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत याने याबाबत एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या न्यू रिलीज डेटविषयी सांगितलं आहे.
‘आदिपुरुष हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रभू श्री रामावरील आमची भक्ती आणि आमच्या गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आदिपुरुषच्या निर्मितीशी निगडित असलेल्या लोकांनी प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव देण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला या रामकाजासाठी नेहमीच प्रेरणा देत आले आहे आणि यापुढेही देत राहतील,’असं या निवेदनात म्हटलं आहे.500 कोटी बजेटच्या ‘आदिपुरूष’साठी आता 16 जूनपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
म्हणून बदलला रिलीजचा प्लान?‘आदिपुरूष’च्या टीझरला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद पाहून मेकर्सने सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर ओम राऊतच्या या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. टीझरमधील व्हीएफएक्स इफेक्टवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. लोकांची ही नाराजी बघता मेकर्स आता व्हीएफएक्सवर नव्याने काम करू इच्छितात, त्यामुळे ‘आदिपुरूष’ लांबणीवर टाकण्यात आला आहे.
हा बिग बजेट चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभू श्री रामची भूमिका अभिनेता प्रभास साकारणार आहे. सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेसाठी आणि चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी क्रिती ची निवड करण्यात आली आहे.