Join us

Adipurush : जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 12:57 PM

Adipurush : आदिपुरुष हा सिनेमा ज्या ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामध्ये हनुमानासाठी एक जागा रिकामी ठेवली जाईल, असं सांगण्यात येत आहे.

प्रभासचा बिग बजेट चित्रपट 'आदिपुरुष' 16 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. आदिपुरुषाचे बजेट 500-600 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. हे लक्षात घेऊन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडली जात नाही. मात्र यादरम्यान या चित्रपटाबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. 

आदिपुरुष हा सिनेमा ज्या ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामध्ये हनुमानासाठी एक जागा रिकामी ठेवली जाईल, असं सांगण्यात येत आहे. असा अनोखा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे. आदिपुरुषच्या टीमने यासंदर्भात दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, "जिथे रामायणाचे पठण केले जाते, तेथे हनुमानाचे दर्शन होते. हा आमचा विश्वास आहे. या श्रद्धेला मान देऊन, प्रभासचा आदिपुरुष प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवली जाईल."

"रामाच्या सर्वात मोठ्या भक्ताचा सन्मान करण्याचा इतिहास ऐका, हे महान कार्य आपण सुरू केलं. हनुमानाच्या सान्निध्यात मोठ्या भव्यतेने निर्माण झालेला आदिपुरुष आपण सर्वांनी पाहावा." फिल्म ट्रेड एक्सपर्ट क्रिस्टोफर कनगराज यांनीही आदिपुरुषबद्दल ट्विट केलं आहे. "PVR तिकीट फॉर आदिपुरुष नॉर्मल सीटसाठी 250 रुपये आणि हनुमानच्या सीटच्या बाजुला बसण्यासाठी 500 रुपये" असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला. चित्रपटातील जय श्री राम (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली.  

या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत, क्रिती माता सीतेच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे.

 

टॅग्स :आदिपुरूषदेवदत्त नागेप्रभासबॉलिवूड