‘बाहुबली’ सीरिजनंतर साऊथ सुपरस्टार प्रभास सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. स्वभावाने अतिशय लाजऱ्याबुज-या प्रभासचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. हेच कारण आहे की, हिंदी चित्रपटांचे चाहतेही प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत. ‘बाहुबली2’नंतर प्रभासकडे बॉलिवूड दिग्दर्शकांची रांग लागली. प्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार, अशीही बातमी आली. पण या सगळ्या अफवा निघाल्या़ कारण ‘बाहुबली2’नंतर प्रभासने लगेच ‘साहो’ हा साऊथ चित्रपट साईन केला. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होत असलेला हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होतोय.
किमान ‘साहो’नंतर तरी प्रभास बॉलिवूड डेब्यूचा विचार करेल, असे मानून बॉलिवूडप्रेमी शांत बसले. पण ताजी बातमी बघता, आणखी दोन वर्षे तरी प्रभास बॉलिवूडचा कुठलाही चित्रपट साईन करण्याच्या मूडमध्ये नसल्याचे दिसतेय. होय, ‘साहो’नंतर प्रभासने पुन्हा एकदा साऊथचाच एक चित्रपट साईन केला आहे. दिग्दर्शक के के राधाकृष्ण यांचा हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण लवकरच या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल सुरू होणार आहे. खुद्द प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली आहे. युरोपच्या पार्श्वभूमीवर असलेला प्रभासचा हा आगामी चित्रपटही बिग बजेट चित्रपट असणार आहे. एकंदर काय तर आणखी वर्षभर तरी प्रभास ‘बुक’ झाला आहे.