Prabhas's Movie: पॅन इंडिया सुपरस्टार प्रभासने 'बाहुबली' चित्रपटातून भारतासह जगभरात लोकप्रियता मिळवली. पण, 'बाहुबली'नंतर प्रभासचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटानेही चाहत्यांची निराशा केली. अशातच प्रभासला एका हिट चित्रपटाची गरज आहे. दरम्यान, फ्लॉप चित्रपट देऊनही प्रभासची क्रेझ कमी झालेली नाही. त्याच्या आगामी 'सालार' चित्रपटाने रिलीजपूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.
या वर्षाच्या अखेरीस प्रभासचा 'सालार' चित्रपट रिलीज होत असून, 'KGF' चित्रपटाचा डायरेक्टर प्रशांत नील याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच चित्रपटाचा टिझरही समोर आला, ज्यात प्रभासचा जबरदस्त लूक दिसत आहे. प्रभासची फॅन फोलोइंग इतकी जबरदस्त आहे की, त्याच्या आधीच्या चित्रपटांनी पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रिलीजपूर्वीच 800 कोटींची कमाई केली आहे.
निर्मात्यांनी चित्रपटाचे डिजिटल, थिएटर, सॅटेलाइट आणि म्युजिक राईट्स विकून 800 कोटींची कमाई केली आहे. ओव्हरसीज राईट्सही 80 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी देशभरात 500 कोटींची कमाई केली आहे, ज्यातील सुमारे 200 कोटी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून मिळत आहेत.
याशिवाय डिजिटल हक्क 200 कोटींना विकले गेले आहेत. 'सालारा' हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो तामिळ, कन्नड व्यतिरिक्त हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या 21 दिवसांनंतर 'सालार' हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता प्रभासचा चित्रपट नेमकी किती कमाई करतो, हे येणाऱ्या काळात कळेलच.