सूर्यवंशी, सिम्बा, डेल्ही बेली अशा बॉलिवूडच्या अनेक सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता प्रदीप काबरा (Pradeep Kabra) ख-या आयुष्यात हिरोपेक्षा कमी नाही. होय, पुराणातील पुंडलिक असो वा श्रावणबाळ यांच्या कथा आणि माता-पित्याच्या सेवेसाठी त्यांनी केलेले अपरिमित कष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहेतच. आजच्या जगातही असे श्रावणबाळ आहेत. प्रदीप काबरा त्यापैकीच एक़ होय, प्रदीप काबराचे हे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्याला कलियुगातील श्रावणबाळ म्हणाल.
प्रदीपच्या इन्स्टा अकाऊंटवर त्याचे आईसोबतचे अनेक व्हिडीओ आहेत. 10 वर्षांपूर्वी त्याच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आला. तेव्हापासून प्रदीप आईची सेवा करतोय. आपल्या आईने आधीसारखे सामान्य आयुष्य जगावं, यासाठी तो रात्रंदिवस खपतो.
होय, रोज न चुकता आईला पाठीवर बसवून तो तिला समुद्रकिनारी घेऊन जातो. इथे आईकडून थेरपी सेशन करून घेतो. घरी तिचे पाय चेपून देण्यापासून अगदी तिला जेवण भरवण्यापर्यंत सगळं काही करतो.
प्रदीप काबरा याने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली ती तामिळ चित्रपटांपासून. तामिळ इंडस्ट्रीत प्रदीपचं मोठं नाव आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटातही त्याने शानदार भूमिका साकारल्या आहेत. वॉन्टेड, दिलवाले, बागी या चित्रपटात विलनच्या भूमिकेत झळलेला प्रदीप लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत करतो. चित्रपटाचं शूटींग संपलं की, त्याचा संपूर्ण वेळ तो आईच्या सेवेत घालवतो.