Join us

सेन्सॉरच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानी यांची गच्छंती; आता प्रसून जोशींकडे धुरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 2:20 PM

गेल्या कित्येक दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेले सेन्सॉर बोर्ड आॅफ सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना अखेर अध्यक्षपदावरून हटविण्यात ...

गेल्या कित्येक दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेले सेन्सॉर बोर्ड आॅफ सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना अखेर अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. आता त्यांची जागा प्रसिद्ध लेखक तथा गीतकार प्रसून जोशी हे घेणार आहेत. शुक्रवारी (दि. ११) घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे इंडस्ट्रीमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून आले आहे. पहलाज निहलानी त्यांच्या तटस्थ स्वभावामुळे इंडस्ट्रीमध्ये वादग्रस्त ठरत होते. गेल्या काही दिवसांपासून तर पहलाज चित्रपटांविषयी अगदी पहारेकºयांच्याच भूमिकेत दिसले. कुठलाही चित्रपट असो, त्याला कात्री लावणारच असा जणू काही त्यांनी पवित्राच घेतला होता. पहलाज यांच्या या स्वभावामुळे इंडस्ट्रीमध्ये नाराजीचा सूर होता. त्याचबरोबर त्यांना पदावरून तातडीने हटविले जावे, अशी मागणी केली जात होती. अखेर आज त्यांची गच्छंती करण्यात आली आहे. खरं तर ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटावर घातलेल्या बंदीपासून पहलाज निहलानी अधिक वादग्रस्त ठरत गेले. त्यावेळी त्यांच्यावर सर्वत्र सडकून टीका करण्यात आली. निर्माता प्रकाश झा यांनी तर आता धार्मिक चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे म्हटले होते; मात्र पहलाज यांनी त्यांच्या स्वभावात किंवा निर्णयात कुठल्याही प्रकारचा बदल केला नव्हता. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असायचे. त्यामुळे त्यांना सेन्सॉरच्या पदावरून हटविले जावे असा इंडस्ट्रीमधून बहुतेक निर्माते तथा दिग्दर्शकांचा आग्रह होता. यामध्ये काही कलाकारांचाही समावेश होता. ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तर सेन्सॉरच्या सदस्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. आता पहलाज यांना पदावरून हटविल्यामुळे इंडस्ट्रीत आनंदाचे वातावरण नसेल तरच नवल. आता या पदाची धुरा प्रसून जोशी यांच्यावर सोपविण्यात आली असून, त्यांच्याकडून चांगल्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.