Join us

प्रकाश झा घेऊन येणार ह्या व्यक्तीचा बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 2:00 PM

प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांच्या जीवनावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा करणार आहेत.

ठळक मुद्देप्रसिद्ध गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. या बायोपिकमध्ये आता आणखीन एका बायोपिकची भर पडणार आहे. प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांच्या जीवनावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा करणार आहेत. तर विनय सिन्हा आणि प्रिती सिन्हा याची निर्मिती करणार आहेत.

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात राहणाऱ्या वशिष्ठ यांचा जन्म २ एप्रिल १९४२ रोजी जिल्ह्यातील बसंतपूर गावात झाला. नेतरहाट विद्यालयातून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तल्लख बुद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वशिष्ठ यांना पाटणा कॉलेजच्या प्रथम वर्षातच बीएससी ऑनर्सची परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली होती. ज्यानंतर त्यांनी १९६९ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापिठातून रिप्रोडुसिंग केर्नेल्स अॅण्ड ऑपरेटर्स विथ अ सायक्लिक वेक्टर या विषयावर पीएचडी केली. पीएचडीनंतर त्यांना नासामध्ये असोसिएट साइंटिस्ट प्रोफेसर पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नोकरी मिळाल्याच्या पुढच्याच वर्षी १९७१मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र त्यांना वैवाहिक जीवनात फार काळ स्थैर्य लाभले नाही. काही वर्षांनंतर ते पत्नीपासून विभक्त झाले आणि १९७२मध्ये भारतात परतले. भारतात आल्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले. पाच वर्षांनंतर त्यांना अचानक सीजोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रासले आणि त्यानंतर काही काळ ते बेपत्ता होते. वशिष्ठ यांना कोणी गणित क्षेत्रातील देव समजते तर कोणी जादूगार. त्यांना या क्षेत्रात अशा काही सिद्धांतांचा अविष्कार केला जे आजही प्रचलित आहेत. एकेकाळी त्यांनी आइनस्टाइनच्या E= MC2 या सिद्धांतालाही आव्हान दिले होते.डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांची भूमिका कोण साकारणार व आणखीन कोण कलाकार असणार हे अद्याप समजू शकलेले नाही. वशिष्ठ यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :प्रकाश झा