फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टार्स आपल्या नावामुळे ओळखले जातात तर अनेक आपल्या भूमिकांमुळे. अशाच अनेक यादगार भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते प्रकाश राज यांचा आज वाढदिवस. प्रकाश राज यांनी अनेक भूमिका अमर केल्यात. पण आज आम्ही त्यांच्या भूमिकांबदद्ल नाही तर त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
प्रकाश राज यांनी 1994 साली ललिता कुमारीसोबत लग्न केले होते. मात्र काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर स्वत:पेक्षा 12 वर्षांनी लहान तरूणीवर प्रकाश राज यांचा जीव जडला. ती कोण तर पोनी वर्मा. होय, पोनी एक कोरिओग्राफर आहे.
पोनी प्रकाश राज यांच्या एका सिनेमात कोरिओग्राफर म्हणून काम करत होती. प्रकाश राज पहिल्याच नजरेत पोनीच्या प्रेमात पडले. पुढे काळासोबत ही लव्हस्टोरी बहरत गेली आणि प्रकाश राज यांनी पोनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण प्रकाश राज यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली होत्या. त्यांच्या संमतीशिवाय हे लग्न शक्य नव्हते. अखेर प्रकाश राज यांनी या लग्नासाठी मुलींची परवानगी घेण्याचे ठरवले.
प्रकाश यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. ते म्हणाले,‘ पोनीसोबत लग्न करण्याचे मनात होते. पण लग्नाचा निर्णय घेण्याआधी मी माझ्या आई आणि मुलींशी बोललो. मी पुन्हा लग्न करू इच्छितो, हे मी त्यांना थेट सांगितले. पोनीने माझ्या मुलींसोबत वेळ घालवावा, अशी माझी इच्छा होती. त्यानुसार पोनी माझ्या पहिल्या पत्नीला आणि दोन्ही मुलींना भेटली. माझ्या दोन्ही मुलींसोबत तिने वेळ घालवला. काही दिवसांनंतर माझ्या मुलींनी मला पोनीसोबत लग्न करण्याची संमती दिली. यानंतर मी पोनीच्या कुटुंबीयांना भेटलो व आमचे लग्न झाले.’