प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. प्रकाश राजचा आज (26 मार्च) ला वाढदिवस असून त्याचा जन्म बेंगलूरुमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले.
प्रकाश राजने त्याच्या करियरच्या सुरुवातीला काही नाटकात काम केले होते. त्याला त्यावेळी यासाठी केवळ 300 रुपये मिळायचे. त्याने काही दूरदर्शन मालिकांमध्ये देखील काम केले आहे. नाटक, मालिकांमध्ये काम करत असताना त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. तो आज एक अभिनेत्यासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
प्रकाश त्याच्या अटींवरच कोणताही चित्रपट स्वीकारतो. कारण तो रात्री तीन वाजता झोपतो आणि सकाळी नऊ वाजता उठतो. त्यामुळे तो कोणत्या वेळात सेटवर जाणार हे तो आधीच निर्मात्यांना सांगतो. प्रकाश राज आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे जवळचे नाते आहे. त्यामुळेच त्याला आजवर तेलगू फिल्म प्रोड्युसरर्सने गैरवर्तुणुकीसाठी सहा वेळा बॅन केले आहे.
प्रकाश राज हा प्रसिद्ध अभिनेता असला तरी त्याने आजपर्यंत कधीच मॅनेजर ठेवलेला नाही. याविषयी दिव्यमराठीने वृत्त दिले आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, प्रकाश स्वतःची फी स्वतःच ठरवतो. तसेच चित्रपट कोणता निवडायचा हा देखील निर्णय तोच घेतो. एवढेच नव्हे तर त्याला येणारे सगळे फोन तो स्वतः अटेंड करतो. त्याच्या कमाईतील 20 टक्के रक्कम तो दान करतो.
प्रकाश राजचे पहिले लग्न अभिनेत्री ललिता कुमारीसोबत झाले होते. पण 2009 मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुली आहेत तर 2010 मध्ये त्याने पोनी वर्मा या कोरिओग्राफरसोबत लग्न केले. पोनी आणि त्याच्यात सुमारे 12 वर्षांचे अंतर आहे. त्यांना एक मुलगा आहे.