Prakash Raj On The Kashmir Files : ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. पण सोबत या चित्रपटावरून दोन वेगळे गट पडल्याचंही चित्र आहे. एक गट ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचं समर्थन करणारा आहे तर दुसरा विरोध करणारा. 1990च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारावर आधारित या चित्रपटावर आता अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करत प्रकाश राज यांनी ‘द काश्मीर फाईल्स’बद्दलचं मत मांडलं आहे. प्रकाश राज यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात ‘द काश्मीर फाईल्स’ संपल्यानंतरची एका चित्रपटगृहाच्या आतील झलक पाहायला मिळतेय. चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहातील प्रेक्षक मुस्लिमांविरोधात नारेबाजी करत आहेत आणि सरतेशेवटी जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. या व्हिडीओला उद्देशून प्रकाश राज यांनी ‘द काश्मीर फाईल्स’वर बोचरी टीका केली आहे.‘हा चित्रपट घाव भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय? फक्त विचारतोय...,’असं ट्विट त्यांनी केलं आहे.
तुम्ही या फाईल्सवरही सिनेमे बनवणार का?
एका ट्विट मध्ये त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सवाल केला आहे. ‘प्रिय अभिनेते, जे आता निर्माते झाले आहेत.. तुम्ही या फाईलींनाही ट्विस्ट देऊन चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित करणार का?असा सवाल प्रकाश राज यांनी एका ट्विटमध्ये विचारला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी गोध्रा फाईल्स, दिल्ली फाईल्स, जीएसटी फाईल्स, नोटाबंदी फाईल्स, कोव्हिड फाईल्स, गंगा फाईल्स, अशी नावं लिहिली आहेत. तर भारतीय लवकरच...
‘फाईल्स... पाइल्स अॅण्ड फाईल्स...नैतिक इशारा... हे कट्टरवादी आपल्या देशातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अशीच फूट पाडत राहिले तर आपण भारतीय लवकरच अल्पसंख्यक होऊ...,’असं अन्य एक ट्विट त्यांनी केलं आहे.
झालेत ट्रोल...या ट्विटनंतर प्रकाश राज अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर काही लोकांनी त्यांच्याविरूद्ध मोहिम उघडली आहे. अनेकांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे. 'चित्रपटाचे यश पाहून वाईट वाटत आहे का? असा सवाल एका नेटकऱ्याने केला आहे.