कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील ज्युनिअर आर्टिस्टवर उपासमारीची वेळ आली आहे. स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, प्रोडक्शनशी संबंधित लोकांची सध्या अतिशय भयाण स्थिती आहे. त्यांना मदत करण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. आता अभिनेता प्रकाश राजने त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांसाठी एक मोठे काम केले आहे.
प्रकाश राजने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या खलनायक अंदाजाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्याने आता एखाद्या नायकापेक्षाही एक चांगले काम केले आहे. प्रकाश राज हा एक अभिनेता असण्यासोबतच एक निर्माता आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना त्याने आता मे महिन्यापर्यंतचा पगार दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्रकाश राजचे प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. त्याने केलेले हे काम कौतुकास्पद असून सगळ्या कलाकारांनी त्याचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या संपूर्ण स्टाफला सुट्टी देखील दिली आहे.
प्रकाश राजने त्याच्या ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट लिहिली असून त्याद्वारे सांगितले आहे की, जनता कर्फ्यू असल्याने माझ्या घरात काम करणारी मंडळी, फिल्म प्रॉडक्शनमधील लोक, माझ्या काही संस्था आणि इतर स्टाफच्या सर्वांना मी मे महिन्यापर्यंतची सॅलरी अगोदरच देऊन टाकली आहे. तसेच मी माझ्या आगामी तीन चित्रपटात रोजच्या वेतनावर काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना निम्म्याहून जास्त वेतन दिलं आहे. पुढेही त्यांच्यासाठी काही ना काही मी करत राहणारच आहे. तुम्ही देखील अशा गरजू लोकांना तुम्हाला जमेल तशी मदत करा... आज सगळ्यांनी एकमेकांना मदत करण्याची गरज आहे.