रूपेरी पडद्यावर बहुतांश खलनायकाच्या भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) रिअल लाईफमध्ये एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीत. आपल्या दमदार अभिनयाने कोट्यावधी चाहत्यांची मनं जिकंणा-या प्रकाश राज यांनी असं काही केलं, की सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. होय, एका अनाथ मुलीनं स्वप्नं पाहिलं आणि प्रकाश राज यांनी तिचं ते स्वप्नं पूर्ण केलं.
या मुलीचं नाव श्रीचंदना. ब्रिटनमध्ये जाऊन उच्चशिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. पण डोक्यावर आई-वडिलांचं छत्र नाही. शिवाय आर्थिक अडचणी. यामुळे ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्याचं श्रीचंदनाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणं कठीण होतं. प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करूनही पुढच्या मार्गात अनंत अडचणी होत्या. अशात तामिळ दिग्दर्शक नवीन मोहम्मद यांना श्रीचंदनाबद्दल कळलं. त्यांनी श्रीचंदनाची कहाणी प्रकाश राज यांना सांगितली. यानंतर काय तर श्रीचंदनाची अख्खी जबाबदारी प्रकाश राज यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी तिला ब्रिटनच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून दिला. यानंतर तिथे तिला नोकरी मिळवून देण्यासाठीही मदत केली. नवीन मोहम्मद यांनी याबद्दल प्रकाश राज यांचे आभार मानले आहेत.
प्रकाश राज यांच्या मदतीनंतर श्रीचंदना ब्रिटनमध्ये पोहोचली आहे. तिथे तिने मोठ्या जिद्दीने मास्टर्स डिग्री पूर्ण केली.
प्रकाश राज यांनी आपल्या करिअरमध्ये 2000 वर अधिक साऊथ चित्रपटांत काम केले. 1998 साली ‘हिटलर’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर वॉन्टेड, सिंघम, दबंग, भाग मिल्खा भाग यासारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केले. ‘सिंघम’ या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा ‘वाँटेड’मधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. प्रकाश राज आज साऊथचे दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. पण आजपर्यंत त्यांनी कधीच मॅनेजर ठेवलेला नाही. प्रकाश राज स्वत:ची फी स्वत:च ठरवतात. येणारे सगळे फोन स्वत: अटेंड करतात आणि कमाईतील 20 टक्के रक्कम दान करतात.