कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत.
अभिनेता प्रकाश राजने काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मे महिन्यापर्यंतचा पगार दिला होता. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या संपूर्ण स्टाफला सुट्टी देखील दिली होती. त्यानंतर रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना त्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये राहाण्याची परवानगी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश राज समाजोपयोगी अनेक कामं करत आहे. प्रकाश राज अनेक लोकांची दररोज जेवण्याची व्यवस्था करत असून अनेकांना त्याने धान्यं दिली आहेत. पण या सगळ्यामुळे आता त्याची आर्थिक स्थिती बिघडू लागली आहे. त्यानेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे.
प्रकाश राजने ट्वीट करत लिहिले आहे की, माझी आर्थिक स्थिती आता ढासाळायला लागली आहे. पण तरीही मी मागे हटणार नाही. मी बँकेतून कर्ज घेऊन अधिकाधिक लोकांना मदत करणार आहे. कारण मला चांगलेच माहीत आहे की, मी पुन्हा चांगले पैसे मिळवू शकतो. पण सध्याच्या काळात लोकांना मदत करण्याची आणि माणुसकी टिकवून ठेवण्याची अधिक गरज आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा लढा देऊया...
प्रकाश राजचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्याचे सगळेच कौतुक करत आहेत. प्रकाश राज खूपच चांगले काम करत असल्याचे त्याचे चाहते त्याला कमेंटद्वारे सांगत आहेत.