रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याने येस बँकेच्या लाखो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच आज येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. येस बँकेत भगवान जगन्नाथाच्या नावे जमा 545 कोटी रूपयेही फसले आहेत. होय, पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे विविध राष्ट्रीयकृत बँकेत असलेले 545 कोटी रूपये महिनाभराआधी येस बँकेत जमा करण्यात आले आहेत. आता हे पैसेही अडकून पडले आहेत. यानिमित्ताने साऊथ व बॉलिवूड स्टार प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रकाश राज यानी ट्वीट करत, सरकारला लक्ष्य केले आहे. ‘हे भगवान, आपको भी लाईन में खडा कर दिया. जगन्नाथ पुरीचे 545 कोटी रूपये येस बँकेत फसल्याने भक्तांना चिंता असायलाच हवी, ’ असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यामुळे लाखो लोक अडचणीत सापडले आहेत. या लोकांमध्ये चित्रपट व टेलिव्हिजनवरील अभिनेत्री पायल रोहतगीचे वडील शशांक रोहतगीच्या नावाचादेखील समावेश आहे. अहमदाबादमधील सुभाष चौक इथल्या येस बँक ब्रांचमध्ये जवळपास दोन कोटी रुपये अडकले आहेत. प्रकाश राज यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांनी रंगभूमीवरून आपल्या करिअरला सुरूवात केली. यानंतर काही दूरदर्शन मालिकांमध्ये देखील काम केले. नाटक, मालिकांमध्ये काम करत असताना त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषेतील चित्रपटांत त्यांनी शेकडो भूमिका साकारल्या.