प्रनूतन बहल बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. ‘नोटबुक’ या चित्रपटातून प्रनूतन बॉलिवूड डेब्यू करतेय. जहीर इक्बाल हा या चित्रपटात प्रनूतनचा हिरो आहे. जहीरचाही हा डेब्यू सिनेमा आहे.प्रनूतनची आजी नूतन यांना कोण विसरू शकेल. नूतन यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. प्रनूतनचे पापा मोहनीश बहल हेही बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. आता आजी आणि पापाच्या पावलावर पाऊल ठेवत प्रनूतन हिनेही बॉलिवूडची वाट निवडली आहे. पण या वाटेवर प्रवास एकटीने करायचा, स्वबळावर करायचा हा प्रनूतनचा हट्ट होता आणि याचमुळे स्ट्रगलच्या काळात ‘बहल’ हे आडनाव लावणे ती टाळायची. अलीकडे एका मुलाखतीत प्रनूतनने यामागचे कारण सांगितले.
तिने सांगितले की, २०१६ मध्ये मी आॅडिशन्स देणे सुरु केले. त्याकाळात मी माझ्या नावापुढे ‘बहल’ हे आडनाव लावणे टाळायचे. कारण एकच होते, जे काही मिळवायचे ते मला स्वबळावर मिळवायचे होते. पापा आणि आजी यांच्या नावाचा, लौकिकाचा वापर न करता मला ही परीक्षा पास करायची होती. माझ्यामते, अभिनेत्री बनायचे तर एक प्रक्रिया पाळणे गरजेचे होते. मी तेच केले.
प्रनूतन आणि जहीर यांच्या अभिनयाने सजलेला ‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.