'हनुमान' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून यामध्ये 'व्हीएफएक्स'चाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. चित्रपटाचे व्हिज्युअल्स नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष'च्या ट्रेलरची आठवण करून देत आहेतच पण 'हनुमान'च्या VFX नं प्रेक्षकांचं मन जिकलं आहे.
दक्षिणात्य बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असा प्रशांत वर्माचा 'हनुमान' चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. भारतीय पौराणिक कथांमधील महत्वाच्या पात्रांवर आधारित हा चित्रपट आहे. 'हनुमान' या चित्रपटात तेजा सज्जा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये संस्कृत श्लोकांचं बॅकग्राऊंड म्युझिक देण्यात आलं आहे ज्यामुळे चित्रपटातील व्हीएफएक्सला आणखीनच वजन प्राप्त झालं आहे. चित्रपटाची कथा 'हनुमाना'च्या व्यक्तिरेखेची आहे, जो रामाच्या भक्तीत तल्लीन आहे आणि जो सर्वशक्तीमान दाखवण्यात आला आहे. आता लोक या टीझरची तुलना दिग्दर्शक ओम राऊतच्या अभिनेता प्रभास आणि सैफ स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या टिझरशी करत आहेत.
ट्विटरवर युजर्स या 'हनुमान'च्या VFX चं जोरदार कौतुक करत आहेत. भारतीय सिनेमाचं पुढचं पाऊल असं म्हणत एका नेटिझननं कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर कुणी 'आदिपुरूष'च्या व्हीएफएक्सवर निशाणा साधत 'हनुमान' चित्रपटातील VFX चं कौतुक केलं आहे. ट्विटरवरही नेटिझन्सनं दोन्ही चित्रपटांच्या बजेटबद्दलही बरीच चर्चा केली आहे. एका यूजरनं 'हनुमान'चं बजेट १२ कोटी आणि 'आदिपुरुष' बजेट ६०० कोटी, अशी तुलना करत 'आदिपुरूष'ला ट्रोल केलं आहे.
लोकांनी 'हनुमान' या चित्रपटातील व्हीएफएक्स उल्लेखनीय असल्याचनं म्हटलं आहे. तसंच हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असं प्रदर्शनाआधीच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. "आदिपुरुष'पेक्षा 'हनुमान'चा टीझर चांगला आहे, 'हनुमान'चा टीझर पाहिल्यानंतर मी म्हणू शकतो की बॉलीवूड एक फसवणूक आणि काळा बाजार आहे. 'आदिपुरुष' हा 500 कोटींचा चित्रपट होऊ शकत नाही", असं एका युझरनं म्हटलं आहे.
प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान'मध्ये तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.