काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलीच चर्चेत होती. बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्सच्या वादात कंगनाने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींवर ड्रग्स घेण्याचा आरोप लावला होता. त्यासोबतच कंगनाचा महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेसोबतचा वादही अनेक दिवस चालला. आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे चेअरमन आणि गीतकार प्रसून जोशी हे कंगनाच्या सपोर्टमध्ये समोर आले आहेत.
इंडस्ट्रीला बदनाम करणं चुकीचंच, पण...
प्रसून जोशी म्हणाले की, कंगना तिचं सत्य बोलत आहे आणि तिच्या बोलण्याला निरर्थक समजलं जाऊ नये. बॉलिवूडमध्ये ड्रग्सच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर टाइम्स नाउसोबत बोलताना प्रसून जोशी म्हणाले की, काही चांगली कामे करणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करणं चुकीचं आहे. पण कंगना सत्य बोलत आहे. त्याला निरर्थक समजू नये.
कंगनाने आरोप लावला होता की, बॉलिवूडमध्ये ९९ टक्के लोक ड्रग्स अॅडिक्ट आहेत. ज्यात अनेक सुपरस्टार्सचाही समावेश आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी कंगनाच्या या वक्तव्यावर टीका केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून खासदार जया बच्चन यांनी संसदेत तिखट प्रतिक्रियाही दिली होती. ज्यानंतर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सपोर्टसाठी समोर आले होते.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये ड्रग्सचं प्रकरण समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने रिया चक्रवर्ती, शौविक, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंतसहीत काही ड्रग पेडलर्सना अटक केली होती. चौकशीदरम्यान काही बॉलिवूड सेलिब्रिटींची नावेही समोर आली होती. ज्यानंतर एनसीबीने सारा अली खान, दीपिका पादुको, श्रद्धा कपूर आणि रकुरप्रीत सिंह यांना चौकशीसाठी बोलवलं होतं.