'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने १ एप्रिल २०१६ रोजी राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. प्रत्युष्याच्या आत्महत्यने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. तिच्या आत्महत्येसाठी बॉयफ्रेंड राहुल राज सिंहवर आरोप करण्यात आले होते. मात्र आता प्रत्युषाच्या मृत्यूनंतर ९ वर्षांनी राहुलने खळबळजनक दावा केला आहे. प्रत्युषा जिवंत होती आणि हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाल्याचं राहुलने म्हटलं आहे.
राहुलने नुकतीच शुभोजीत घोष यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल भाष्य केलं. राहुलनेच प्रत्युषाला गळफास घेतल्यानंतर सर्वात आधी पाहिलं होतं . तोच प्रत्युषा हॉस्पिटलमध्येही घेऊन गेला होता. मात्र घरी ती जिवंत होती. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर लवकर उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा राहुलने केला आहे.
"हॉस्पिटलमध्ये फॉर्मेलिटी करण्यात नेहमीपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे तिच्यावर लवकर उपचार झाले नाहीत. त्यामुळे प्रत्युषाचा मृत्यू झाला", असं राहुल म्हणाला. याशिवाय त्याने अभिनेत्री काम्या पंजाबीला प्रत्युषाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. काम्यावर त्याने आरोपही केले आहेत. प्रत्युषाने अवघ्या २४ व्या वर्षी टोकाचं पाऊल उचललं. १ एप्रिल २०१६ रोजी तिने आत्महत्या केली. तिच्या पालकांनीच राहुल राज सिंहविरोधात तक्रार दाखल केली होती.