मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करुन आमरण उपोषणाला सुरूवात केली. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. रविवारी त्यांची प्रकृती खालावली होती, तरीही जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्रातील अनेक मराठा बांधव त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, आता अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh)ने ट्विट करुन मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत राज्य सरकारला विनंती केली आहे.
अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो शेअर करत लिहिले की, जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.
मनोज जरांगे यांनी दर्शविली पाणी पिण्याची तयारीआमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे उपस्थित महिला, नागरिकांनी टाहो फोडत मनोज जरांगे यांनी पाणी प्यावे असा हट्ट धरला. तुम्ही आम्हाला पाहिजे. तुम्हाला आज पाणी प्यावे लागेल. आरक्षण आज ना ना उद्या मिळेल, तुमच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळेल. समाजासाठी पाणी प्या. समाजाचे ऐकावे लागेल. माता भगिनी सागत असतील तर पाणी प्यावे लागेल, अशी साद उपस्थितांनी घातली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याची तयारी दर्शविली.