पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षस्थानी असताना त्यांच्यावर अनेक जण नाराज होते. आता मात्र खुद्द पहलाज निहलानी हेच सेन्सॉर बोर्डावर नाराज झाले आहेत. होय, पहलाज निहलानी निर्मित ‘रंगीला राजा’ या आगामी चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने २० कट्स सुचवले आहेत आणि यामुळे निहलानी संतापले आहे. इतके की, सेन्सॉरच्या या निर्णयाविरोधात त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले कट्स योग्य नाहीत. आमचा चित्रपट कुठल्याही अंगाने अश्लिल नाही, असे निहलानींनी याचिकेत म्हटले आहे.
सेन्सॉर बोर्डाकडे पाठवल्यानंतर ४० दिवसांनी त्यांनी ‘रंगीला राजा’ पाहिला. यामुळे आम्हाला आमच्या चित्रपटाची रिलीज डेट ऐनवेळी पुढे ढकलावी लागली. आमच्यानंतर २० दिवसांनी पाठवलेल्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला त्यांनी लगेच प्रमाणपत्र दिले. सेन्सॉरचे विद्यमान अध्यक्ष प्रसून जोशी आणि आमिर खान चांगले मित्र आहेत. त्यामुळे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला फायदा पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक आमच्या चित्रपटाकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोपही निहलानी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. प्रसून जोशी राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.एकेकाळी चित्रपटांवर बेधडक कात्री चालवल्यामुळे पहलाज निहलानी टीकेचे धनी ठरले होते. त्यांच्याविरोधात अनेकांनी मोर्चा उघडला होता. पण आता निहलानी स्वत:च याचे बळी ठरले आहेत.‘रंगीला राजा’ या चित्रपटात गोविंदाने विजय माल्याची भूमिका साकारली आहे. तीन नट्या याद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. गोविंदा आणि निहलानी यांनी ३१ वर्षांपूर्वी ‘इल्जाम’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.