बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) महिला सक्षमीकरणाची मोठी पुरस्कर्ती आहे. या मुद्यावरच्या प्रत्येक कार्यात ती हिरहिरीने भाग घेते. याच विषयावरच्या येऊ घातलेल्या ‘नो मीन्स नो’ या सिनेमाचे पोस्टर प्रीतीने शेअर केले आहे. भारताचे माजी पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांनीही ‘नो मीन्स नो’चे (No Means No) पोस्टर शेअर करत, या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि पोलंडचा संयुक्त उपक्रम असलेला हा सिनेमा येत्या 5 नोव्हेंबरला हा सिनेमा जगभर प्रदर्शित होतोय.
‘ नो मीन्स नो या पहिल्या इंडो-पोलिश चित्रपटाचे पोस्टर रिलीज. माजी पर्यटन मंत्री या नात्याने हा सिनेमा भारत व पोलंडच्या पर्यटनक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे. माझे कौटुंबिक मित्र व दिग्दर्शक विकाश वर्मा, गुलशन ग्रोव्हर आणि ध्रुव वर्मा यांना शुभेच्छा, असे ट्विट सहाय यांनी केले आहे. एका सत्यघटनेवर हा सिनेमा विकाश वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. विकास वर्मा यांचे मेंटॉर आणि हॉलिवूड मेगास्टार स्टीव्हन सीगल यांनीही या सिनेमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रीती झिंटाने सिनेमाचे पोस्टर शेअर करत, हा सिनेमा आपल्या हृदयाच्या अगदी जवळचा असल्याचे म्हटले आहे. ‘माझे मित्र व दिग्दर्शक विकाश वर्मा दिग्दर्शित नो मीन्स नोचे शानदार पोस्टर रिलीज झाले. यात माझा आवडता ध्रुव वर्माचा अभिनय पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा महिला सक्षमीकरणावर आधारित असल्यामुळे हा सिनेमा माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. या चित्रपटाला मी मनापासून शुभेच्छा देते,’ असे ट्विट तिने केले आहे.
एका स्कीइंग चॅम्पियनची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा स्कीइंग चॅम्पियन पोलंडला जातो आणि पोलंडच्या एका मुलीच्या तो प्रेमात पडतो, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती कथा आहे. सिनेमात ध्रुव वर्मा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय गुलशन ग्रोव्हर, शरद कपूर, नीतू चंद्रा, दीपराज राजा, नाजिया हसन, कॅट क्रिस्टियन यांच्याही दमदार भूमिका आहेत. पोलंडचे काही दिग्गज कलाकारही या सिनेमात झळकणार आहेत. यात अॅना गुजिक, पावेल चेक, नतालिया बक, सिल्विया चेक, जर्सी हैंडजलिक, अॅना एडोर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. श्रेया घोषाल आणि हरिहरन यांच्या आवाजात चित्रपटाची गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. पोलंडमधील अत्यंत सुंदर अशा लोकेशनवर सिनेमाचे शूटिंग करण्यात आलेले आहे. झी7 फिल्म्स पोलंडद्वारा निर्मित याचित्रपटाच्या माध्यमातून पोलंडमध्ये पर्यटन वाढवणे आणि भारत-पोलंडमधील संस्कृतीचा संपर्क अधिक बळकट करण्याचा हेतू आहे.