Preity Zinta: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणजे प्रिती झिंटा सध्या चर्चेत आहे. पण, ती चर्चेत येण्याचं कारण एखादा सिनेमा नाही तर राजकीय वाद आहे. प्रिती झिंटा आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक वाद रंगल्याचं दिसून आलं आहे. प्रिती झिंटाचे १८ कोटी रुपयांचं कर्ज बँकेनं माफ केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. परंतु यावर प्रिती झिंटानं एका निवेदनाद्वारे बँकेकडून कर्जमाफीच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिलं. सर्व आरोपाचं खंडन करत तिनं काँग्रेसवर टीका केली. चुकीचे आरोप केल्यानंतर आता प्रिती काँग्रेसवर मानहानीचा (Preity Zinta On Filing A Defamation Case Against Rahul Gandhi ) खटला दाखल करणार की नाही यावर तिनं भाष्य केलं आहे.
नुकतंच प्रिती झिंटा हिनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी एका चाहत्यांनं तिला राहुल गांधीवर मानहानीचा खटला दाखल करणार का? असा प्रश्न केला. यावर उत्तर देत ती म्हणाली, "अशा प्रकारे कोणाचीही बदनामी करणे मला योग्य आहे, कारण ते (राहुल गांधी) दुसऱ्याच्या कृतींसाठी जबाबदार नाहीत. मी समस्या किंवा मुद्दे भांडणातून नाही तर थेट हाताळण्यावर विश्वास ठेवते. मला राहुल गांधींशीही काही अडचण नाही, म्हणून त्यांना शांततेत जगू द्या आणि मीही शांततेत जगेन".
प्रिती आणि काँग्रेस यांच्यातील वाद काय?
काही दिवसांपुर्वी केरळ काँग्रेसच्या (Kerala Congress) ऑफिशियल एक्स अकाऊंटवरुन दावा करण्यात आला होता की प्रीति झिंटाचं सोशल मीडिया अकाऊंट हे भाजपा सांभाळतं आणि यामुळे अभिनेत्रीचं 18 कोटींचं लोन माफ झालंय. काँग्रेसच्या याट ट्विटनंतर अभिनेत्री भडकली आणि या बातम्या खोट्या असल्याचं म्हणत काँग्रेसवर टीका केली. तिनं ट्विट करत म्हटलं, "मी माझे सोशल मीडिया अकाउंट स्वतः चालवते आणि खोट्या बातम्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला हवी. कोणीही माझ्यासाठी काहीही केलेलं नाही किंवा कोणतेही कर्ज माफ केलेले नाही. मला धक्का बसला आहे की एक राजकीय पक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी माझ्या नावाचा आणि प्रतिमांचा वापर करून खोट्या बातम्यांना प्रोत्साहन देत आहेत, वाईट गॉसिप करत आहेत. ते क्लिक बाइट्समध्ये गुंतले आहेत. रेकॉर्डसाठी कर्ज घेतले गेले होते आणि ते पूर्णपणे १० वर्षांपूर्वीच फेडले गेले आहे. आशा आहे की हे स्पष्ट होईल आणि भविष्यात कोणतेही गैरसमज होणार नाहीत". प्रितीनं फटकारल्यानंतर काँग्रेसने आपली चूक मान्य केली.
प्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर १९४७' या चित्रपटातून पडद्यावर परतण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट एका ऐतिहासिक कथेवर आधारित आहे आणि आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला जात आहे. आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित 'लाहोर १९४७' या ऐतिहासिक नाटकातून आमिर खान पुन्हा पडद्यावर परतण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात सनी देओल आणि त्याचा मुलगा करण देओल देखील आहेत.