Preity Zinta On Joining Politic: राजकारण आणि बॉलीवूड हे एक जुनं नातं असल्यासारख आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. अभिनेत्री कंगना रणौत,रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारनारे ज्येष्ठ अभिनेता अरुण गोविल, अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि गोविंदा असे अनेक कलाकार राजकारणात सक्रीय झाले आहेत. आता बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटाला तिचे चाहते ती राजकारणात येणार का असे विचारताना दिसून येत आहेत. यावर खुद्द अभिनेत्रीनं खुलासा केलाय.
प्रितीचा सोशल मीडियावरही तिचा दांडगा वावर आहे. रोखठोक मत मांडण्यासाठी ती ओळखली जाते. नुकतंच तिनं ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्यांना तिला "राजकारणात येण्याचा विचार करत आहे का?" असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना प्रीतीनं स्पष्टपणे कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "नाही! राजकारण माझ्यासाठी नाही. गेल्या काही वर्षांत, विविध पक्षांनी मला तिकिटे आणि राज्यसभेची जागा देऊ केली. परंतु मी नम्रपणे नकार दिला आहे. कारण मला ते नको आहे".
याशिवाय एका चाहत्यानं तिला महाकुंभ २०२५ चे फोटो शेअर केल्यानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल(Preity Zinta Over Online Trolling) प्रश्न केला. यावर ती म्हणाली, "जे लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, ते आधीच तुमच्या खाली आहेत. मग त्यांची आणि ट्रोलची कोणाला पर्वा आहे. खरे धैर्य तेव्हा लागतं, जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आणि तुमच्या सभोवतालमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करता. जगाला इतरांसाठी एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी काम करता".
प्रीतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं शाहरुख खानसोबत 'दिल से' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर प्रीतीने बॉलिवूडला 'क्या कहना', 'कल हो ना हो', 'सलाम नमस्ते', 'वीर झारा', 'संघर्ष' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. यशाच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये प्रीतीने जीन गुडइनफशी लग्न केलं आणि ती चित्रपटांमध्ये कमी दिसू लागली. आता ती पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. लवकरच ती सनी देओलसोबत 'लाहोर १९४७' मध्ये दिसणार आहे. याशिवाय, प्रीती ही पंजाब किंग्जची मालकीण आहे.