डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रीति झिंटा (Preity Zinta) सध्या जाम भडकलीये. कारणही तसंच आहे. नुकतंच प्रीतिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला. अलीकडे आलेल्या दोन वाईट अनुभवांवर तिने राग व्यक्त केला.
तिने लिहिलं...“या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमुळे मी पूर्णत: हादरले आहे. पहिली घटना माझ्या लहान मुलगी जियाबरोबर घडली आहे. एका महिलेला माझ्या मुलीबरोबर फोटो काढायचा होता. परंतु, मी प्रेमाने नकार दिला. यानंतर ती तिथून निघून गेली. पण अचानक पुन्हा आली आणि तिने जियाला जबरदस्तीने आपल्या कुशीत घेतलं व तिच्या चेहऱ्यावर किस केलं. जियाच्या गालावर किस केल्यानंतर “किती गोड मुलगी आहे” असं म्हणत ती तिथून निघून गेली. माझी मुलं बागेत खेळत असताना हा प्रकार घडला. मी सेलिब्रिटी नसते तर मी या प्रकारावर खूप वाईट पद्धतीने रिॲक्ट केलं असतं. पण मला कोणत्याही प्रकारचा ड्रामा नको होता,” असं प्रीतीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्या दिव्यांगाने...एका अन्य घटनेचाही उल्लेख प्रीतिने केला आहे. एका दिव्यांगाला पैसे न दिल्यामुळे प्रीति सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. या घटनेबद्दलही प्रीतिने लिहिलं. तिने पोस्टमध्ये म्हटलं, “दुसऱ्या घटनेचा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. एक दिव्यांग व्यक्ती माझ्याकडे पैसे मागत आहे. पण, मला फ्लाइट पकडण्यासाठी उशीर होत होता. शिवाय त्यादिशी माझ्याकडे कॅश नव्हती तर फक्त क्रेडिट कार्ड होते. माझ्यासोबतच्या महिलेने त्याला थोडे पैसेही दिले. परंतु, ते पैसे पुरेसे नसल्याने त्याने महिलेकडे चक्क परत फेकले. त्याला राग आला आणि तो माझ्या गाडीचा पाठलाग करू लागला. या व्यक्तीला मी आधीही खूप वेळा पैसे दिले आहेत. पण, यावेळी पैसे न दिल्याने तो आक्रमक झाला. हा सगळा प्रकार फोटोग्राफरला मजेशीर वाटला. आम्हाला मदत करण्याऐवजी त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आणि हे सगळे हसत होते. गाडीचा पाठलाग करू नकोस, असं त्याला कोणीही सांगितलं नाही. जर त्याला दुखापत झाली असती, तर सगळ्यांनी मला, बॉलिवूडला दोषी ठरवलं असतं. नकारात्मकता पसरवली गेली असती.
मला वाटतं की, सर्वात आधी मी एक माणूस आहे, त्यानंतर मी एक आई आणि त्यानंतर सेलिब्रिटी आहे. माझ्या मुलांबरोबर फोटो काढण्यासाठी त्यांच्या जवळ येऊ नका. ते सेलिब्रिटी नाहीत. ती लहान मुलं आहेत. मी कलाकार आहे पण माझ्या मुली कोणत्याही पॅकेज डीलचा भाग नाहीत. दुसरं म्हणजे, जे फोटोग्राफर्स आम्हाला फोटो, व्हिडीओसाठी विनंती करतात, त्यांनी माणुसकीही दाखवली पाहिजे. पुढच्या वेळी शूट करुन हसण्यापेक्षा मदत केली पाहिजे, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला आहे.