गेल्या काही दिवसांपासून प्रिती झिंटा चांगलीच चर्चेत आहे. प्रिती सध्या सुरु असलेल्या IPL च्या हंगामात सहभागी आहे. प्रिती IPL मधील पंजाब संघाची मालकीण आहे. संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रिती कायमच मैदानात हजर असते. प्रितीने काहीच दिवसांपुर्वी रोहित शर्माला पंजाब संघात घेण्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. जे चांगलंच व्हायरल झालं. पण आता याच वक्तव्याला फेक न्यूज असं म्हणत प्रितीने तिचा संताप व्यक्त केलाय.
प्रितीने तिच्या ट्विटरवर काही मीडिया बातम्यांचा दाखला देत त्यांना फेक न्यूज म्हटलं आहे. प्रिती म्हणाली, "फेकन्यूज. ही सर्व आर्टिकल एकदम चुकीची आहेत. मी रोहित शर्माचा खूप सन्मान करते. मी त्याचं कायम कौतुकही करत असते. पण मी अशी कोणतीही मुलाखत दिली नाही. मी असं कोणतंही विधान केलं नाहीय. मी शिखर धवनचा खूप आदर करते. सध्या शिखर धवनला दुखापत झाली आहे. आणि या काळात असं आर्टिकल येणं खूप वाईट गोष्ट आहे."
प्रिती पुढे म्हणाली, "कोणताही संदर्भ न घेता असं आर्टिकल पब्लिश करणं आणि व्हायरल करणं चुकीचं आहे. मी नम्रतेने सर्वांना सांगू इच्छिते की, कोणत्याही मीडियाने असं आर्टिकल पब्लिश करु नका. मी एवढंच सांगू इच्छिते की, भविष्यात आमच्याकडे अत्यंत चांगली गोष्ट असून सामने जिंकणं हा आमच्याजवळचा एकमात्र उद्देश आहे." अशाप्रकारे रोहित शर्माला पंजाब संघात घेण्याच्या त्या वक्तव्यावरुन प्रितीने राग व्यक्त केलाय. याआधी "मी रोहितला माझ्या संघात घेण्यासाठी जीवाची बाजी लावेन. आमच्या संघाला एका विजयी नेतृत्वाची गरज आहे", असं प्रितीचं वक्तव्य व्हायरल झालेलं.