कोट्यवधी रूपयांच्या फसवणुकीचा आरोप असलेली बॉलिवूड निर्माती प्रेरणा अरोरा अखेर 8 महिन्यांची शिक्षा भोगून जामिनावर तुरुंगातून बाहेर आली. गत 8 महिन्यांपासून ती तुरुंगात बंद होती. तिच्यावर अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता.तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रेरणाने स्पॉटबॉयशी बोलताना आपली चूक मान्य केली. मी खूप मोठी चूक केली. किंबहुना अनेक चुका केल्यात. माझ्याकडे एखादा मेंटॉर असताच तर गोष्टी इतक्या बिघडल्या नसत्या. पण आता मी परत आले आहे आणि मी नव्याने सुरुवात करणार. निश्चितपणे यासाठी काही वेळ लागेल, असे ती म्हणाली.
प्रेरणाने वासू भगनानीकडून पॅडमॅन व केदारनाथ या चित्रपटांसाठी पैसे उधार घेतले होते. पण नंतर ते परत केले नाहीत. या प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने तिला अटक केली होती.प्रेरणान अशा अन्य काही कंपन्यांसोबत करार करून अर्थसहाय्य घेतल्याची माहिती तपासातून पुढे आली होती. या पैशातून प्रेरणाने 8 कोटींचा बंगला खरेदी केला. इतकेच नाही तर वेगवेगळ्या महागड्या बँडचे शूज, कपडे, पर्स खरेदी केल्यात. तिच्याविरोधात दाखल आरोपपत्रानुसार, प्रेरणाजवळचे अनेक कागदपत्रे बनावट आहेत. प्रेरणाने रूस्तम, टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली.