पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय राजकारणातील सध्या चर्चेत असलेलं नाव. पंतप्रधान मोदी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा चांगलाच प्रचार करताना दिसत आहेत. देशातील विविध शहरांमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केलं. अशातच मोदींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी देवानंदचा एक सिनेमा पाहून समाजकार्याची प्रेरणा कशी घेतली? याचा किस्सा सांगितलाय.
देवानंदचा हा सिनेमा मोदींचा फेव्हरेट
१९६५ साली आलेला देवानंदचा गाईड हा सिनेमा मोदींचा आवडता सिनेमा आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी लडाखमधील मुलांच्या गटाशी संवाद साधताना मधील 'गाइड' हा त्यांचा आवडता चित्रपट असल्याचं सांगितलं. यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले होते, "मी सहसा चित्रपट पाहत नाही. पण माझ्या तारुण्याच्या काळात मी खूप सिनेमे बघायचो. तेव्हाही केवळ मनोरंजनासाठी चित्रपट पाहण्याचा माझा स्वभाव कधीच नव्हता. त्याऐवजी त्या चित्रपटांनी सांगितलेल्या कथांमध्ये जीवनाचे धडे शोधणे ही माझी सवय होती.
'गाईड' सिनेमाविषयीची मोदींची आठवण
नरेंद्र मोदी गाईड सिनेमाविषयी पुढे म्हणाले, "मला आठवतं की, एकदा मी माझ्या काही शिक्षक आणि मित्रांसोबत आर के नारायण यांच्या कादंबरीवर आधारित 'गाइड' हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. आणि चित्रपटानंतर माझे माझ्या मित्रांसोबत वादविवाद झाले. माझा युक्तिवाद असा होता की, चित्रपटातील मध्यवर्ती कल्पना अशी की शेवटी प्रत्येकाला त्याच्या अंतरात्म्याचे मार्गदर्शन मिळते. पण मी खूप लहान असल्याने माझ्या मित्रांनी मला गांभीर्याने घेतले नाही.”