सध्या 'छावा' सिनेमाची (chhaava movie) चांगली चर्चा आहे. १४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' सिनेमा रिलीज झाला. सिनेमा रिलीज होऊन एक महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला असला तरीही 'छावा'ची हवा अजून ओसरली नाहीये. सिनेमाने जगभरात ७०० कोटींहून जास्त व्यवसाय केलाय. 'छावा' सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडला. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) 'छावा' सिनेमा पाहणार असून संसदेत सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं जाणार आहे.या तारखेला 'छावा'चं संसदेत विशेष स्क्रीनिंगसंसद भवनात 'छावा'चं विशेष स्क्रीनिंग होणार आहे. पंतप्रधान मोदी २७ मार्चला संसद भवनातील लायब्ररी इमारतीमधील बालयोगी सभागृहात विकी कौशलच्या 'छावा'च्या स्क्रीनिंगला उपस्थिती दर्शवणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे इतर मंत्री आणि संसदेतील इतर राजकीय व्यक्ती सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी याआधीच 'छावा' सिनेमाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे 'छावा' सिनेमा बघितल्यावर मोदींच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.या स्क्रीनिंगला 'छावा'मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजन सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. 'छावा' सिनेमाविषयी मोदी काय म्हणाले होते?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटाबाबत देशभरात सुरू असलेल्या चर्चेवर पंतप्रधान म्हणाले, 'सध्या सर्वत्र 'छावा'ची धूम आहे. महाराष्ट्र आणि मुंबईने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांनाही नवी उंची दिली आहे. सध्या सगळीकडे छावाची धूम पाहायला मिळत आहे. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीत संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय याच रूपाने होतो."