कलाकार : प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, एजाज खान, सचिन पिळगांवकर, सुशांत सिंगदिग्दर्शक : नागेश कुकूनूरलेखक : नागेश कुकूनूर, रोहित बाणावलीकरभाग : ९स्टार : तीन परीक्षण : अबोली शेलदरकर
वेबसिरीज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यापूर्वीच्या सीझन प्रमाणेच हा सीझनही ट्विस्ट आणि आश्चर्यचकित करणाऱ्या धक्क्यांनी भरलेला आहे. दुसऱ्या सीझनचा शेवट जिथे झाला त्यानंतर काहीच काळानंतरचं हे कथानक आपल्यासमोर उलगडायला सुरुवात होते. मुलाच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकलेली महाराष्ट्राची मुख्यमंत्री पूर्णिमा गायकवाड (प्रिया बापट) ही अज्ञातवासात जाते, त्यानंतर तिथून ती गायब होते अन् तिच्या जागी ॲक्टिंग सीएम म्हणून पदभार सांभाळणारे तिचे वडील म्हणजेच साहेब अर्थात अमेयराव गायकवाड (अतुल कुलकर्णी) हे एन्काऊंटर स्पेशलिस्ट वसिम खान (एजाज खान) याच्यावर पूर्णिमाला शोधून आणायची जबाबदारी सोपवतात. काही दिवसांनी वसिम खान पूर्णिमाला घेऊन परत येतो खरा पण तोवर महाराष्ट्रातील राजकारणात आणि महाराष्ट्र जनशक्ती पार्टीत बरीच खलबतं व्हायला सुरुवात झालेली असते. साहेबांचे खास मित्र आणि अत्यंत कपटी, धूर्त असा राजकारणी जगदीश गुरव (सचिन पिळगांवकर) हा त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात करतो. गायकवाड कुटुंबाच्या जिवावर उठलेला जगन (सुशांत सिंग) शिवाय अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या अमेयराव गायकवाड यांच्यापासून लपवून ठेवल्या आहेत, त्या समोर आल्यावर अमेयराव नेमकं काय करणार? पूर्णिमा पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळणार का? यात वसिम खानची नेमकी काय भूमिका आहे अन् जगदिश गुरव नेमका कोणतं कारस्थान करणार? या सगळ्याची उत्तरं आपल्याला या तिसऱ्या सीझनमध्ये मिळतील.
लेखन व दिग्दर्शन : नागेश कुकुनूर आणि रोहित बाणावलीकर लिखित अन् दिग्दर्शित या वेबसिरीजची कथा, पटकथा आणि खासकरून तिसऱ्या सीझन मधील यातील पात्रांचे उतार चढाव हे फारच उत्तमरीत्या स्क्रीनवर दाखवले आहेत. पॉलिटिकल थ्रिलर म्हटल्यावर संवाद तर लाजवाब असणारच त्यात काहीच शंका नाही. दमदार कथा संवाद, वेगवान पटकथा या सगळ्याला उत्तम जोड मिळाली आहे ते यातील कलाकारांच्या जबरदस्त अदाकारीची.
अभिनय : अतुल कुलकर्णी यांचं अमेयराव गायकवाड यांच्या पात्रावर या नव्या सीझनमध्ये पूर्ण फोकस नसला तरी यात बऱ्याच ठिकाणी अतुल यांचा तगडा अभिनय पाहायला मिळतो. एकीकडे राजकीय संघर्ष आणि दुसरीकडे कौटुंबिक कलह यातून कसाबसा सावरत बाहेर पडणाऱ्या अमेयराव गायकवाड ऊर्फ साहेब यांचा प्रवास उत्तमरीत्या उलगाडला आहे. राजकारण सोडून पुन्हा पोलिसात आलेला वसिम खानच्या बिनधास्त स्वभावाबरोबरच त्याची एक हळवी बाजू यात आपल्याला पाहायला मिळते. सचिन पिळगांवकर यांनी साकारलेल्या कपटी जगदीश गुरव या पात्राने मात्र या सीझनमध्ये उत्तम कामगिरी केली आहे, या पात्राचे बरेच पैलू या तिसऱ्या सीझनमध्ये उलगडतात. विभाच्या भूमिकेत दिव्या सेठ शाह, तसेच एका मीडिया चॅनलचा मालक आणि कॅपिटलिस्टची भूमिका साकारणारा रणविजय हे दोघे लक्षात राहतात. या सगळ्यांपेक्षा काहीसं वरचढ काम प्रिया बापटचं आहे हे मात्र हा सीझन पाहिल्यावर आपल्या तोंडी येतं.
सकारात्मक बाजू : उत्कृष्ट राजकीय वेबसिरीज, तगडे कलाकार मंडळीनकारात्मक बाजू : विशेष नाहीथोडक्यात : एक खिळवून ठेवणारी वेबसिरीज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही आहे आणि जर तुम्हाला पाॅलिटिकल थ्रिलर आवडत असतील तर ही सिरीज अजिबात चुकवू नका.