गेल्या महिन्यांत प्रियंका चोप्राने बॉलिवूडमध्ये असलेल्या राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे करत खळबळ माजवली होती. ती म्हणाली होती इथल्या राजकारणाला कंटाळून मी बॉलिवूडला रामराम केला होता. प्रियंका चोप्रा म्हणाली होती की, 'एक वेळ अशी आली होती की मी बॉलिवूड सोडण्याच्या मूडमध्ये होते आणि काहीतरी मार्ग शोधत होते. मला इंडस्ट्रीत एका कोपऱ्यात ढकलले जात होते. लोक कास्ट करत नव्हते. हे घडत होते कारण मी राजकारण करण्यात माहिर नाही. मला राजकारणाचा कंटाळा आला होता आणि मला विश्रांतीची गरज होती. आता प्रियंकाने कास्टिंगबाबत खुलासा केला आहे.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रियंकाने हे स्वीकारलं की गेल्या 5 ते 10 वर्षांत इंडस्ट्रीत खूप बदल झाले आहेत. ती म्हणाले की, इंडस्ट्रीत बाहेरून नवीन टॅलेंट येत आहेत. जेव्हा तिने पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा असे नव्हते. ती म्हणाले की, संधी आणि कामाच्या ठिकाणी चर्चा व्हायला हवी आणि कास्टिंग हे गुणवत्तेच्या आधारावर व्हायला हवे.
प्रेक्षकांना कोणाला बघायचे आहे यावरही कास्टिंग अवलंबून असायला हवे, असेही ती म्हणाली. इंडस्ट्रीबाहेरील नवे चेहरे बघायला मिळाल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केलं. यासाठी संघर्ष करणाऱ्या तिच्या पिढीतील कलाकारांनाही तिने श्रेय दिले आणि त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीच्या पद्धतीत मोठा बदल झाला.
प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिची इंटरनॅशनल सिरीज 'सिटाडेल' रिलीजसाठी सज्ज आहे. पाच वर्षांपूर्वी 'सिटाडेल'ची कल्पना घेऊन रुसो ब्रदर्सने तिच्याशी संपर्क साधला होता. याशिवाय प्रियांका लवकरच फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच आलिया भट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.