कुण्या एका व्यक्तिचे मत हेडलाईन कशी बनू शकते? ट्रोलिंगवर प्रियंका चोप्राचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 10:13 AM2019-03-04T10:13:49+5:302019-03-04T10:15:01+5:30
प्रियंकाने ट्रोलिंगवर परखड विचार मांडले. सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगमुळे कलाकारांवर प्रचंड दबाव निर्माण होत असल्याचे ती म्हणाली.
ठळक मुद्देपाकिस्तानी युजर्सनी तिच्या या ट्विटचा विरोध चालवला आहे. युनिसेफची सदिच्छादूत या नात्याने प्रियंकाने शांततेला प्रोत्साहन द्यायला हवे. पण तिने असे न करता,भारतीय हवाई दलास युद्धासाठी प्रोत्साहित केले, असे पाकिस्तानी युजर्सचे म्हणणे आहे.
प्रियंका चोप्रा आता केवळ बॉलिवूड अभिनेत्री नाही तर ग्लोबल स्टार आहे. याच ग्लोबल स्टार प्रियंकाला युनिसेफच्या सदिच्छादूत पदावरून हटविण्यासाठी पाकिस्तानींनी गेल्या दोन दिवसांपासून आॅनलाईन मोहिम उघडली आहे. प्रियंकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. अशात प्रियंकाने ट्रोलिंग विरोधात मोर्चा उघडला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना प्रियंकाने ट्रोलिंगवर परखड विचार मांडले. सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगमुळे कलाकारांवर प्रचंड दबाव निर्माण होत असल्याचे ती म्हणाली.
ट्रोलिंगच्या वाढत्या प्रकारामुळे केवळ दहशत आणि नैराश्य निर्माण होते. ही व्यक्ति यासाठी ट्रोल झाली, त्यासाठी ट्रोल झाली, अशा बातम्या मीडियात येतात आणि त्याची हेडलाईन बनते. मला कळत नाही की, कुण्या एका व्यक्तिचे मत हेडलाईन कशी बनू शकते? ज्यांचे काही अस्तित्वचं नाही, अशा केवळ ५००-६०० वा १००० लोकांच्या प्रतिक्रियांना मीडिया इतके महत्त्व का देते, हेही मला कळत नाही. यामुळे कलाकारांवर केवळ आणि केवळ दबाव वाढतो. हा दबाव चाहत्यांकडून नाही तर केवळ इंटरनेटमुळे वाढतो. यामुळे केवळ समाजात केवळ नकारात्मकता वाढते, असे प्रियंका म्हणाली.
काही मूठभर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी मी नाहीच. त्यांच्या म्हणण्यानुसार मी का जगू? मी केवळ माझ्या मनाचे ऐकते. एक सेलिब्रिटी असले तरी मला माझी मते आहेत, असेही प्रियंका म्हणाली.
अलीकडच्या काळात प्रियंका अनेक मुद्यांवर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. कधी कपड्यांमुळे तर कधी लग्नात आतीषबाजी केल्यामुळे ती ट्रोल झाली. तूर्तास पाकिस्तानी युजर्सनी तिला लक्ष्य केले आहे. गत १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुज्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या कारवाईनंतर भारतीय हवाई दलाचे कौतुक करणारे ट्विट प्रियंकाने केले होते. ‘जय हिंद’, असे तिने या ट्विटमध्ये लिहिले होते. पाकिस्तानी युजर्सनी तिच्या या ट्विटचा विरोध चालवला आहे. युनिसेफची सदिच्छादूत या नात्याने प्रियंकाने शांततेला प्रोत्साहन द्यायला हवे. पण तिने असे न करता,भारतीय हवाई दलास युद्धासाठी प्रोत्साहित केले, असे पाकिस्तानी युजर्सचे म्हणणे आहे.