प्रियंका चोप्रा ( Priyanka Chopra) आताश: ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या. नकारात्मरक भूमिकांमध्येही तिने जीव ओतला. प्रियंकांच्या नकारात्मक भूमिका म्हटल्यावर ‘ऐतराज’ (Aitraaz) हा सिनेमा लगेच डोळ्यांपुढे येतो. या चित्रपटात प्रियंकाने सोनियाची व्यक्तिरेखा साकारली होती आणि या भूमिकेनं पीसीला अक्षरश: झपाटलं होतं. होय, या कॅरेक्टरमधून बाहेर पडायला प्रियंकाला बरेच दिवस लागलेत. अगदी यामुळे तिला आईचा ओरडाही खावा लागला. फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका यावर बोलली. या मुलाखतीत ती ‘ऐतराज’बद्दल आणि या सिनेमात साकारलेल्या निगेटीव्ह रोलबद्दल भरभरून बोलली.
ती म्हणाली...प्रियंका म्हणाली, खरं तर मी लगेच भूमिकांमधून बाहेर पडते. पण ‘ऐतराज’मधील सोनियाच्या भूमिकेतून बाहेर पडणं सोप्प नव्हतं. मला यामुळे प्रचंड त्रास झाला. एकाक्षणी मी अगदी घरी देखील सोनियासारखं वागू, बोलू लागले होते. माझं वागणं बदललं होतं. तिच्यासारखं वाईट वागत नव्हते. पण चित्रपटात सोनिया जशी बोलते, जशी चालते, उठते, बसते.... सगळं तसंच मी करू लागले होते. माझं ते विचित्र वागणं आईच्या लक्षात आलं आणि तिने लपून माझा व्हिडीओ बनवला आणि मला दाखवला. तू घरी येण्याआधी या कॅरेक्टरमधून बाहेर पडत जा, असं तिने मला जरा रागानेच सांगितलं. हे घर आहे, तुझ्यासमोर कॅमेरा नाही..., असं ती म्हणाली. अर्थात असं फक्त एकदाच घडलं आणि ते सगळं फारच मजेशीर होतं.
असं का?कदाचित सोनियाचं कॅरेक्टर साकारताना मी जरा घाबरलेली होते. अक्षय व करिना दोघंही मोठे स्टार होते आणि त्यांच्यापुढे मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं. कदाचित म्हणून सोनियाच्या कॅरेक्टरने मला इतकं झपाटलं होतं. अर्थात माझ्या आईने मला लवकरच जमिनीवर आणलं, असंही प्रियंका म्हणाली.‘ऐतराज’ हा सिनेमा २००४मध्ये प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.