ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा अलीकडे अमेरिकेचा लोकप्रीय टॉक शो ‘द एलन डिजेनेरस’मध्ये दिसली. प्रियंकाचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ लवकरच प्रदर्शित होतोय. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने या शोमध्ये हजेरी लावली. पीसीने या हॉलिवूडपटाचे धडाक्यात प्रमोशन केले. सोबतचं आपल्या आगामी प्रोजेक्टचाही खुलासा केला. त्यानुसार, लवकरच प्रियंका मा आनंद शीला यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात दिसणार आहे.खुद्द प्रियंकाने याबाबतचा खुलासा केला.
मी बेरी लेविन्सनसोबत एका प्रोजेक्टवर काम करतेय. मा आनंद शीला यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट आहे. गुरु मां शीला यांची व्यक्तीरेखा मी साकारणार आहे. भारतीय असलेल्या मा शीला रजनीश ओशो यांच्या अतिशय जवळ होत्या. त्यांनी रजनीश यांच्यासाठी खूप काम केले आणि त्यांना अमेरिकेत लोकप्रिय केले. तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकले आहे किंवा नाही हे मला माहिती नाही परंतु त्या अद्भूत व्यक्ती होत्या, असे प्रियंकाने यावेळी सांगितले.
ओशो आश्रमात 55 मिलियन डॉलरचा घोटाळा केल्याप्रकरणी मा शीला यांना 39 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर 20 वर्षांनी शीला यांनी ‘डोंट किल हिम! ए मेम्वर बाई मा आनंद शीला’ या पुस्तकात ओशो आश्रम आणि त्यासंदर्भात अनेक रहस्यांवरुन पडदा उठवला होता. शीला यांनी पुस्तकात अनेक ठिकाणी ओशोंना धन आणि भौतिक सुख-सुविधांचे आकर्षण असल्याचा उल्लेख केला आहे.
1949मध्ये मा आनंद शीला यांचा बडोद्यात जन्म झाला. त्यांचे वडील अंबालाल पटेल हे ओशोंचे शिष्य होते. ओशो नेहमी त्यांच्या घरी येत असत. त्यावेळी शीला या 16 वर्षांच्या होत्या. ओशोंना पाहिले आणि मी तात्काळ त्यांच्या प्रेमात पडले आणि संन्यास घेतला, असे मा शीला यांनी पुस्तकात लिहिले आहे. संन्यास घेतल्यानंतर मा शीला अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्या आणि भारतात परतल्या. त्यानंतर त्या ओशोंच्या पुणे येथील आश्रमात राहू लागल्या.