बॉलिवूडची बिनधास्त गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या जोधपूर येथील रॉयल वेडिंगला सुरूवात झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या गाण्यांवर इंडोवेस्टर्न स्टाईलमध्ये संगीत सोहळयाचे आयोजन केले होते. यावेळी विविध जुन्या-नव्या अशा धमाकेदार गाणी सादर झाली तसेच उपस्थित पाहुणेमंडळी आणि नातेवाईकांनी या सोहळयाचा साक्षीदार बनत यथेच्छ आनंद लुटला. त्यासोबतच लग्नापूर्वीच्या विविध विधी आणि कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.
जोधपूर हे शहर सध्या भव्य लग्नाचा साक्षीदार बनले आहे. या सुंदर शहरात उम्मेदभवन पॅलेस मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न शहरवासियांना अनुभवायला मिळणार आहे. सुत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या संगीतसोहळयादरम्यान हिंदी बॉलिवूड आणि इंग्रजी हॉलिवूड गाणी सादर झाली. विशेषत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीतील ७० आणि ८० च्या दशकांतील सुंदर गाण्यांवर यावेळी नृत्य सादर झाले. ‘ये शाम मस्तानी’,‘तुम मिले दिल खिले’, ‘मेरे लिए मेरे लिए’,‘दिल की कसम’ या गाण्यांनी शुक्रवारी सोहळयाची रंगत आणली. तसेच इंग्रजी गाणे टायटॅनिकचे थीम साँगही सादर झाले.
या सोहळयाचे विशेष हे होते की, या गाण्यांसह डान्सही बघावयास मिळाला. गणेश हेगडे यांनी कोरिओग्राफी करत वेगवेगळया डान्सचे सादरीकरण केले. प्रियांका चोप्रा हिचे एक्स मॅनेजर चांद मिश्रा हे देखील जोधपूर येथे पोहोचले, ते म्हणाले की, ‘अनेक कलाकारांनी भारताबाहेर लग्न केले. परंतु, निक आणि प्रियांका यांचे लग्न शानदार आणि अविस्मरणीय असणार आहे. लग्नाच्या चार-पाच दिवसापूर्वी प्रियांका चित्रपटाची शूटिंग करत होती. प्रियांका प्रत्येकक्षणी इतिहास बनवताना दिसत आहे. मी पूर्वीपासून पाहतो की, ती प्रचंड मेहनती आणि कष्टाळू आहे. '
प्रियंका आणि निकचा विवाह २ आणि ३ डिसेंबर रोजी जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस हॉटेलमध्ये पार पडणार आहे. हा शाही विवाह हिंदु आणि ख्रिश्चन पद्धतीने पार पडणार आहे. या शाही लग्नासाठी जोधपूरचे उमेद भवन अगदी नववधूप्रमाणे नटले आहे. अख्खा महल लाईट्सच्या झगमगाटाने न्हाऊन निघाले आहे.