प्रयागराज महाकुंभ येथे शाही स्नानासाठी अनेक भाविकांची रोज गर्दी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते प्रत्येक सामान्य भारतीय तसंच काही परदेशातील लोकांनीही इथे येऊन पवित्र स्नान केलं. नुकतंच निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) हे देखील प्रयागराजला पोहोचले. तिथलं दृश्य पाहून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
एएनआयशी बोलताना बोनी कपूर म्हणाले, "मी इथे अनेकदा येऊन गेलो आहे. एकदा आजोबांच्या अस्थिविसर्जनासाठी मी इथे आलो होतो. त्यानंतर एकदा इव्हेंटसाठी आलो होतो. पण आज जे दृश्य इथे दिसतंय ते याआधी कधीच दिसलं नव्हतं. भारताची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. इथलं हे दृश्य पाहून मी आता खरंच मान्य करतो की ही १४०-१५० कोटींची जनता आहे."
बोनी कपूर यांच्याआधी अनेक सेलिब्रिटींनी प्रयागराजला येत गंगेत स्नान केले. १४४ वर्षांनी हा योग आला असल्याने शक्य तितक्या सर्वांनीच इथे येऊन शाही स्नान केलं आहे. योगी सरकारने यासाठी अत्यंत आधुनिक गोष्टींसह चांगल्या व्यवस्थापना केली. पंतप्रधान मोदींनीही त्यांचं कौतुक केलं होतं. अनुपम खेर, हेमा मालिनी, रेमो डिसुजा, पंकज कपूर, कबीर खान, शंकर महादेवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत महाकुंभला भेट दिली आहे.