सध्या निर्माती एकता कपूर चांगलीच चर्चेत आहे. त्यामागचं कारण म्हणजे एकता कपूर यांचा आगामी सिनेमा 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाच्या स्फोटक विषयांमुळे लोकांच्या उत्सुकतेचं कारण बनला आहे. गोध्रा हत्याकांड आणि साबरमती एक्सप्रेसला लागलेली आग हा विषय केंद्रस्थानी ठेऊन सिनेमाची कथा रचण्यात आलीय. काल या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. त्यावेळी एकता कपूरने केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून सर्वांनी तिची प्रशंसा केलीय.
एकता कपूर काय म्हणाली?
'द साबरमती रिपोर्ट'च्या ट्रेलर लॉंचला एकताने मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. एका व्यक्तीने एकताला विचारलं की, हा सिनेमा कोणत्या एका धर्माला धरुन केंद्रस्थानी आहे का? तेव्हा एकता म्हणाली,"मी एक हिंदू आहे याचाच अर्थ मी धर्मनिरपेक्ष आहे. मी कोणत्याही धर्मावर टीकाटिप्पणी करणार नाही कारण मी हिंदू आहे. मी सर्व धर्मांवर प्रेम करते." एकताचं वक्तव्य ऐकताच उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
एकता कपूर पुढे म्हणाली, "मला आठवतंय एक वेळ अशी होती जेव्हा आपण पूजा लपूनछपून करायचो. पूजापाठावर आमचा यावर विश्वास नाही पण तुमच्या विश्वासासाठी मी सोबत चालत राहीन, असं लोक म्हणायचे. त्यामुळे याची लाज का वाटावी?" असं एकता कपूर म्हणाली. एकता कपूरची निर्मिती असलेला 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमा १५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमात विक्रांत मेस्सी, रिद्धी डोग्रा, राशी खन्ना प्रमुख भूमिकेत आहेत.